
तालुक्यातील भिवबंदर येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने या प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “दापोलीचा निसर्ग, शेती, बागायती आणि मच्छीमारी उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. प्रकल्पाविरोधात ऐतिहासिक लढा उभारू,” असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दिला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नरेंद्र करमरकर, ज्योती विचारे, माजी नगराध्यक्ष ममता मोरे, नगरसेवक संदीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, दापोलीची ओळख पर्यटन, विस्तीर्ण समुद्रकिनारे, मासेमारी, आंबा-काजूच्या बागा आणि निसर्गसंपन्न परिसर अशी आहे. अशा तालुक्यात अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा निर्णय घेताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक होते. “आमचा विकासाला विरोध नाही; मात्र दापोलीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या विकासाला विरोध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पामुळे मच्छीमार, शेतकरी आणि बागायतदारांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दापोलीत जहाजबांधणी, ऑटोमोबाईलसह पर्यावरणपूरक उद्योग आणावेत आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार योगेश कदम यांच्या भूमिकेवरही गुजर यांनी सवाल उपस्थित केला. “एकीकडे प्रकल्पाची माहिती नव्हती असे सांगायचे आणि दुसरीकडे त्याला ‘ग्रीन’ प्रकल्प म्हणायचे, ही भूमिका परस्परविरोधी आहे,” असा आरोप त्यांनी केला. पालकमंत्री उदय सामंत शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे सांगत असतील, तर शासनाने स्थानिकांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
प्रकल्पाच्या आसपास सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्याचा आरोपही गुजर यांनी केला. या व्यवहारांची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. आता हा लढा केवळ एका गावाचा राहणार नाही. गावागावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधू. दापोलीचा निसर्ग आणि स्थानिकांचा हक्क वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र लढा उभारू, असा निर्धार गुजर यांनी व्यक्त केला.

























































