
तुर्कीच्या पश्चिमेकडील एका हायस्कूलबाहेर मंगळवारी एका किशोरवयीन मुलाने गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात 11 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पश्चिम किनारपट्टीवरील पर्यटन शहर इझमीरजवळील मनिसा प्रांतातील तुर्गुतलू येथे सकाळी 8.0 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, असे प्रादेशिक गव्हर्नरच्या कार्यालयाने सांगितले.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जखमींपैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संशयित मुलाचे आई-वडील आणि आजोबा यांनाही ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर पोलीस आणि बचाव पथके तसेच घाबरलेले पालक घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शाळेबाहेर होणाऱ्या गोळीबारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

























































