
गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजातील डीजे, प्लाझ्मा-लेझरचा वापर करू नये. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करून भारतीय संस्कृतीतील पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहन अहिल्यानगर पोलिसांनी केले आहे. तसेच नियमांचा भंग केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला आहे.
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायाचे स्वागत करताना यंदा अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले. तसेच कमी आवाजातील साऊंड सिस्टीमचा वापर करून पोलिसांना सहकार्य केले. आता गणेश विसर्जन मिरवणुकांची तयारी सुरू झाली असून, मोठ्या संख्येने मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणासह अन्य नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजातील डीजे, प्लाझ्मा-लेझर आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उपकरणांचा वापर टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर गणेश मंडळांचे पदाधिकारी, मंडळांचे प्रमुख तसेच डीजे चालक आणि मालक यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये डीजेचा वापर न करण्याबाबत तसेच प्लाझ्मा-लेझर बंद ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधितांना पोलिसांकडून नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सव हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असल्याने गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवावे, असे आवाहन अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे. ढोल-ताशे, लेझीम यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सव साजरा करताना ध्वनीची निर्धारित मर्यादाही पाळावी, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मोठ्या आवाजातील डीजेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांना त्रास होऊ शकतो. ध्वनी प्रदूषणाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विसर्जन मिरवणुकीत उत्साहाच्या भरात नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडून आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणासंदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे ही प्रत्येक गणेश मंडळाची आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजविणे किंवा प्लाझ्मा-लेझरचा वापर केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अधीक्षक सुदर्शन यांनी दिला.
‘डीजेचा वापर करू नका; आवाजाची मर्यादा पाळा’
“सर्व गणेश मंडळांना डीजेचा वापर करू नये, अशी विनंती करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली आहे. सर्वांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, ध्वनीची निर्धारित मर्यादा पाळा; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला.





























































