एसीच्या स्फोटामुळे रुग्णालयात आग, तीन नवजात बाळांचा मृत्यू; तेलंगणातील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणातील आदिलाबाद येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) रुग्णालयाच्या स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटला (SNCU) सोमवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. आगीच्या वेळी वॉर्डमध्ये असलेल्या 28 बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

सोमवारी रात्री सुमारे 11.50 वाजण्याच्या सुमारास SNCUमध्ये अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, एसीमध्ये झालेल्या विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे. आगीमुळे काही वेळातच संपूर्ण वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा पसरल्या. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचारी आणि पालकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. बालकांना बाहेर काढण्यासाठी वॉर्डच्या काचा फोडण्यात आल्या. खबर मिळताच अग्निशमन दलाची गाडी रुग्णालयात दाखल झाली आणि जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीचा रुग्णालयाच्या इतर भागात फैलाव होऊ नये, यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या.

या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यापैकी एका बालकाचे वय अवघे पाच दिवस होते. आगीतून वाचवण्यात आलेल्या इतर बालकांना तातडीने उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. काही बालकांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आगीमागील नेमके कारण काय होते, तसेच दुर्घटनेच्या वेळी रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, एसी यंत्रणा आणि अग्निसुरक्षा व्यवस्था योग्य प्रकारे कार्यरत होती का, याची तपासणी केली जात आहे. कोणत्याही प्रकारची हलगर्जी किंवा निष्काळजीपणा या दुर्घटनेला कारणीभूत ठरला का, याचाही तपास केला जाणार आहे.