
मोबाइल युजर्ससाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. TRAIने दूरसंचार ग्राहक संरक्षण (तेरावे संशोधन) विनियम, 2026 जारी केला असून, त्यानुसार सर्व दूरसंचार कंपन्यांना आता फक्त व्हॉइस कॉलिंग आणि SMSची सुविधा असलेले, डेटा नसलेले रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.
TRAIच्या म्हणण्यानुसार, सध्या अशा प्रकारचे प्लॅन फार कमी उपलब्ध आहेत. विशेषतः कमी वैधता असलेल्या प्लॅनमध्ये केवळ कॉलिंग आणि SMSची सुविधा असलेले पर्याय कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
30 दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेसाठी स्वतंत्र प्लॅन
नव्या नियमांनुसार, ज्या ग्राहकांना 30 दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेचा रिचार्ज हवा आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक दूरसंचार कंपनीला व्हॉइस आणि SMS सुविधा असलेला प्लॅन उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. या प्लॅनमध्ये डेटा देणे बंधनकारक असणार नाही.
याशिवाय ग्राहकांना दर महिन्याला ठरावीक तारखेला रिचार्जचे नूतनीकरण करता येईल, असा एक पर्यायही कंपन्यांना द्यावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना दरवेळी वेगवेगळ्या तारखांना रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही.
30 दिवसांपेक्षा जास्त वैधतेचा प्लॅनही अनिवार्य
केवळ कमी वैधतेचेच नाही, तर 30 दिवसांपेक्षा जास्त वैधता असलेला किमान एक व्हॉइस-SMS ओन्ली प्लॅन प्रत्येक दूरसंचार कंपनीला उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. त्यामुळे दीर्घ वैधतेचा रिचार्ज हवा असलेल्या ग्राहकांनाही डेटा नसलेला पर्याय मिळणार आहे.
TRAIने कंपन्यांना या प्लॅनच्या किमती योग्य प्रमाणात कमी ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे डेटा असलेल्या प्लॅनच्या तुलनेत केवळ कॉलिंग आणि SMSसाठीचे प्लॅन ग्राहकांना स्वस्तात उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
ज्यांना डेटा नको, त्यांना मोठा फायदा
TRAIच्या या निर्णयाचा फायदा विशेषतः मोबाइल डेटा वापरत नसलेल्या किंवा अत्यल्प डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठीही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
आतापर्यंत डेटा वापरत नसतानाही अनेक ग्राहकांना डेटा असलेले रिचार्ज प्लॅन घ्यावे लागत होते. मात्र, नव्या नियमांमुळे ग्राहकांना आपल्या गरजेनुसार केवळ कॉलिंग आणि SMSची सुविधा असलेला प्लॅन निवडता येणार आहे. त्यामुळे अनावश्यक डेटासाठी पैसे खर्च करण्याची गरज राहणार नाही.
1,132 प्रतिक्रिया मिळाल्यानंतर निर्णय
TRAIने सांगितले की, या नव्या नियमांच्या मसुद्यावर नागरिक आणि संबंधितांकडून एकूण 1,132 प्रतिक्रिया प्राप्त झाल्या होत्या. या प्रतिक्रियांचा विचार केल्यानंतर TRAIने अंतिम नियम जारी केले आहेत.
नव्या नियमांमुळे मोबाइल ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार रिचार्ज प्लॅन निवडण्याचे अधिक पर्याय उपलब्ध होणार असून, विशेषतः डेटाची गरज नसलेल्या ग्राहकांसाठी स्वतंत्र आणि दीर्घ वैधतेचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.


























































