सामना टाय, तरीही कांस्य हातातून निसटले, ‘सेंशु’चा चेतन भट्टला धक्का; तैपेईचे कराटेमध्येही पदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्कोअरबोर्डवर सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. दोन्ही खेळाडूंच्या नावासमोर समान गुण. सामना संपला, पण निकाल मात्र बरोबरीचा नव्हता. कराटेच्या मॅटवर रंगलेल्या पुरुषांच्या 84 किलो कुमिते कांस्यपदकाच्या लढतीत हिंदुस्थानच्या चेतन भट्टला चिनी तैपेईच्या मेंग-यू चुंगकडून ‘सेंशु’ नियमानुसार पराभव पत्करावा लागला आणि हाताशी आलेले कांस्यपदक अवघ्या एका पहिल्या गुणामुळे निसटले.

दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक युको मिळवला. त्यामुळे निर्धारित वेळ संपली तेव्हा गुणफलक 1-1 असा होता. मात्र कराटेमध्ये सामना बरोबरीत सुटल्यास निकाल ठरवण्यासाठी ‘सेंशु’चा नियम लागू होतो. या नियमानुसार प्रतिस्पर्ध्याने त्याआधी गुण मिळवलेला नसताना सर्वप्रथम गुण मिळवणाऱ्या खेळाडूला आघाडी मिळते. या लढतीत पहिला गुण चुंगने मिळवला होता. त्यामुळे स्कोअर समान असतानाही निकाल त्याच्या बाजूने गेला.

चेतनसाठी हा पराभव अधिक बोचरा ठरला. कारण कांस्यपदकाच्या लढतीपूर्वीच त्याला मोठ्या धक्क्याचा सामना करावा लागला होता. उपांत्य फेरीत जॉर्डनच्या मोहम्मद अल-जाफारीविरुद्ध त्याला 0-8 असा पराभव स्वीकारावा लागला आणि सुवर्णपदकाची संधी संपली. त्यामुळे कांस्यपदकाची लढत त्याच्यासाठी शेवटची संधी होती.

कांस्याच्या या लढतीत दोघांनीही प्रत्येकी एक युको मिळवल्यानंतर सामना शेवटच्या क्षणापर्यंत ताणला गेला. प्रेक्षकांना आता अतिरिक्त संधी मिळेल किंवा निर्णायक परिस्थिती निर्माण होईल, अशी अपेक्षा असतानाच 1-1 हा अंतिम स्कोअर ठरला. त्यानंतर ‘सेंशु’चा निकाल समोर आला. पहिला गुण मिळवला म्हणून चुंग विजेता ठरला. म्हणजे चेतनच्या पराभवात गुणांची तफावत नव्हती, फक्त गुण मिळवण्याची वेळ निर्णायक ठरली.त्यामुळे पदक एका खेळाडूच्या गळ्यात आणि दुसऱयाच्या हातात काहीच पडले नाही.

सेंशु म्हणजे काय?

  • हा कराटेच्या पुमिते प्रकारातील टाय झाल्यावर विजेता ठरवण्यासाठी वापरला जाणारा नियम आहे
  • सामना संपताना दोन्ही खेळाडूंचे गुण समान असतील तर काही परिस्थितीत ज्याने प्रतिस्पर्ध्याच्या गुणापूर्वी पहिला गुण मिळवला, त्याला विजेता घोषित केले जाते.
  • या पहिल्या गुणाला सेंशुचा फायदा म्हणतात.
  • मात्र हा फायदा मध्यंतरानंतर किंवा सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रतिस्पर्ध्याने मिळवलेल्या गुणामुळे गमावला जाऊ शकतो, त्यामुळे नियम थोडा अधिक गुंतागुंतीचा आहे.