
कल्याणच्या ग्रामीण भागातील रहिवाशांना केमिकलमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे समजताच ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी रायते नळ पाणीपुरवठा योजनेला भेट दिली. तसेच येथील यंत्रणेची पाहणी केली. येथील पाण्याचे नमुनेही ताब्यात घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
कल्याण ग्रामीणमध्ये केमिकलमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना जुलाब व उलट्यांचा त्रास होत आहे. यासंदर्भातील वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होताच रायते ग्रामपंचायतीचे प्रशासक सुनील संत व ग्रामविकास अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांनी गंभीर दखल घेतली. तसेच त्यांनी रायते येथे जाऊन पाण्याचे नमुने घेतले. ते तपासणीसाठी पाठवले आहेत. अंदाज आठ दिवसांनंतर अहवाल येणार असून त्यानंतर कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.
रायते पाणीपुरवठा योजनेतून रायते तसेच गोवेली परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेकांना उलट्या, जुलाबांचा त्रास सुरू झाला आहे. दरम्यान रहिवाशांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


























































