बेरोजगार अभियंत्यांच्या कामात 73 लाखांचा अपहार, शिंदे गटाच्या नीलेश सांबरेवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या नावावर मंजूर झालेल्या कामाच्या निधीत फेरफार करून तब्बल ७३ लाख १३ हजार ८८४ रुपयांचा शासकीय निधी स्वत:च्या कंपनी खात्यात वळवल्याप्रकरणी शिंदे गटाचा उपनेता तथा जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे मालक नीलेश सांबरे याच्यासह बांधकाम विभागाच्या तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जव्हार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

जव्हार उपविभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संजय डोंगरे यांनी फिर्याद दिली आहे. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘ब-१’ नोंदवहीतील २०१४-१५ मधील करारनामा क्रमांक ३३१, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७ आणि ३४४ या सात कामांची चौकशी करण्यात आली. ही कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या नावावर मंजूर होती. मात्र ३१ मार्च २०१९ रोजी बिले अदा करताना मूळ कंत्राटदाराच्या नावाऐवजी जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या नावाने ऑनलाइन कॅशबुक, रोखवही आणि संबंधित कागदपत्रांत नोंदी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस या प्रकरणात नीलेश सांबरेला अटक कधी करतात याकडे पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या कामांची रक्कम केली वळती

वडवली-देहरे-आकरे-तलावली रस्ता सुधारणा व गटारीचे खोदकाम, जव्हार-पाली रस्ता, टेंभुर्णी, येणे, झाप, नांदगाव, केळघर, साखरी गटारीचे खोदकाम, मोखाडा, चास, हातेरी, सारसून गटारीचे खोदकाम, मोखाडा चास हातेरी सारसून मार्गावरील खड्डे खडी व ग्रिटने भरणे, खर्डी, परळी, उजनी रस्ता व गटार, वाडा, मलवाडा, जव्हार, खंबाळा रस्ता व गटार या सात कामांमध्ये ७३ लाख १३ हजार ८८४ रुपयांचा अपहार झाला आहे.