
केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जे काही चाललं आहे ते सर्वच भयानक आहे. आजचा पेपर वाचून मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही असे म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिपत्याखाली निवडणूक आयोग येतो. गृहखात्याच्या अंतर्गत निवडणूक आयोग येतो. याचा अर्थ ज्ञानेश कुमार हे गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार, आदेशाने दबावाखाली आणि संगनमताने ही गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य केलं आहे. याच्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचे गुन्हेगार आहेत. अमित शहा जे सध्या बेपत्ता आहेत. त्यांना फूड पाॅइझन झाला आहे की, या देशामध्ये विष पसरून ते कुठे फरार झालेत. प्रधानमंत्री मोदी यांना लोकशाही आणि संविधानाची थोडी चाड असेल तर त्यांनी अमित शहा यांना गृहखातं आणि मंत्रीमंडळातून ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे.
ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, या देशाच्या निवडणूक आयोगाशी संविधानाशी इतका मोठा खेळ गेल्या 80 वर्षात कुणी केला नाही. यातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या, त्यानंतर ज्ञानेश कुमार यांना बरखास्त केलं पाहिजे. त्यांच्यावर खटला चालवला पाहिजे. ज्ञानेश कुमार यांच्याकडून कबुली घेतली पाहिजे की त्यांनी कुणाच्या आदेशानुसार हे बेईमानी कृत्य केलं आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे पश्चिम बंगाल आणि बिहारच्या विधानसभा निवडणूका ह्या एसआयआरच्या माध्यमातून अमित शहाने ज्ञानेश कुमारला हाताशी धरून जिंकल्यात हे प्रधानमंत्री मोदींनी मान्य केलं पाहिजे.
राऊत या विषयासंदर्भात अधिक भाष्य करत म्हणाले, निवडणूक आयोगातल्या दोन निवडणूक आयुक्तांनी सुखबीर संधु आणि विवेक जोशी यांनी आॅन रेकाॅर्ड स्पष्ट केलं आहे की, ज्ञानेश कुमार हा भ्रष्ट, बेईमान आणि लोकशीही विरोधी माणूस आहे. अमित शहा आणि ज्ञानेश कुमार यांनी दोघांनी मिळून या देशाचं वाटोळं केलं आहे. लोकशाहीची इतकी मोठी हत्या यापूर्वी अशी कुणी केली नव्हती. एक लक्षात घ्या या देशात हुकूमशाही राजवट यापद्धतीनं सुरु आहे आणि मोदी जर रोखू शकत नसतील, हतबल असतील तर देशाच्या राष्ट्रपतींना चाड असेल तर त्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे.
राष्ट्रपती या तिनही सेनादलाच्या प्रमुख आहेत. जर या देशामध्ये अशा प्रकारचं संकट येत असेल तर त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन निवडणूक आयुक्त या ज्ञानेश कुमारला ताबडतोब तुरूंगात टाकलं पाहिजे असे मत यावेळी राऊत यांनी व्यक्त केले. यावर अधिक बोलताना राऊत म्हणाले, त्यासाठी त्यांना आर्मीची मदत घ्यावी लागली तर ती घ्यायला हवी. आज पोलीस अमित शहाच्या कंट्रोलमध्ये आहेत. राष्ट्रपतींनी आर्मीची मदत घ्यावी आणि हा देश वाचवावा. नरेंद्र मोदी हे अत्यंत हतबल आणि असहाय झालेले दिसले. त्यांना अमित शहा आणि ट्र्म्प ब्लॅकमेल करताहेत. अशा परिस्थितीमध्ये हा देश वाचवायचा असेल तर तिन्ही सेनादलाच्या प्रमुख असणाऱ्या राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा लागेल. सगळ्यात आधी मोदींमध्ये हिंमत असेल तर अमित शहाला गृहखात्यावरून आणि मंत्रालयातून बरखास्त केलं पाहिजे ही देशाची मागणी आहे. नाहीतर या देशातील जनआंदोलन घरापर्यंत धडकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिला.
सदर विषयावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, विरोधी पक्ष या गोष्टीवर सध्या चर्चा करत आहेत. यामध्ये काॅक्रोच जनता पार्टी (सीजेपी) सुद्धा आहे. या निवडणूक आयोगातला जो भ्रष्ट आणि बेईमान आहे त्याला त्याचं कोर्ट मार्शल व्हायलाच हवं. या देशाचा कायदा तो मानायला तयार नसेल तर राष्ट्रपतींनी यावर तातडीने अॅक्शन घेणं गरजेचं आहे. ज्ञानेश कुमार यांना हटवा आणि त्यांना जेलमध्ये टाका.. त्यांच्यासारखा भ्रष्ट आणि तानाशाह निवडणूक आयुक्त ना जन्माला आला ना जन्माला येईल.


























































