
महाराष्ट्राच्या लोककलेचा मानबिंदू असलेला लावणी सम्राज्ञी शकुंतलाई नगरकर यांचे आज वयाच्या ६६व्या वर्षी पुण्यात निधन झाले. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शकुंतलाईंचा जन्म १९६० मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई छबूबाई नगरकर याही त्या काळातील नामांकित लावणी कलावंत होत्या. घरातूनच लावणीचा वारसा लाभलेल्या शकुंतलाईंनी वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी पहिल्यांदा घुंगरू बांधले आणि लावणी क्षेत्रात पदार्पण केले.
१९७४ मध्ये मुंबईमधील गिरगावातील लालबागच्या प्रसिद्ध हनुमान थिएटरमध्ये त्यांच्या लावणीचा प्रवास खऱ्या अर्थाने गाजला. शकुंतलाईंनी केवळ पारंपरिक शैलीवर अवलंबून न राहता, कथकगुरू वसंतराव घाटे यांच्याकडून नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. शाहिर पठ्ठे बापूराव पुरस्कार, २०१८मध्ये ‘मुंबई महापौर पुरस्कार’ आणि ‘नाट्यगौरव पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. गेल्या वर्षी त्यांना राज्य सरकारचा ‘कला पुरस्कार’ही प्रदान करण्यात आला होता.





























































