
उद्योगपती जमशेदजी टाटा आणि टाटा कुटुंबाने उद्योगाला समाजसेवेची मूल्याधिष्ठत दिशा दिली. त्यामुळे टाटा ट्रस्टची सामाजिक बांधिलकी आणि संस्थात्मक भूमिका जपली गेली पाहिजे. टाटा समूहाचा वारसा जपणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. टाटा समूहाच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन यांच्या झालेल्या फेरनियुक्तीवरून सध्या टाटा समूहामधील वाद उफाळून आला आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन यांची पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी कार्यकारी अध्यक्षपदावर निवड करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र टाटा सन्समधील सर्वाधिक भागधारक असलेल्या टाटा ट्रस्टने हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगत याला विरोध दर्शविला आहे.
पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून यात म्हटले आहे की, जमशेदजी टाटा यांची दूरदृष्टी सर दोराबजी टाटा आणि सर रतन टाटा यांनी पुढे नेली. उद्योगातून निर्माण होणारी संपत्ती पुन्हा समाजाच्या हितासाठी वापरली जावी हा या विचाराचा केंद्रबिंदू होता.
या समृद्ध वारशाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र आहे ही आपल्या राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा मूलभूत संशोधन संस्था, टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स या ट्रस्टने स्थापन केलेल्या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था आहेत. या प्रतिष्ठत धर्मादाय ट्रस्टचे कायदेशीर मुख्यालयही महाराष्ट्रात आहे. ट्रस्टची भूमिका कमकुवत झाली तर देश आणि राज्यातील जनतेला आधार देणाऱ्या या संस्थांवरही त्याचा परिणाम होईल, असेही शरद पवार यांनी म्हटले.





























































