गॅस गळती की अन्न विषबाधा… गूढ वाढले, दिव्यात एकाच घरात सँडविच विक्रेते बेशुद्ध; एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवा पूर्वेतील तीन सँडविच विक्रेते एकाच घरात बेशुद्धावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये गोविंद गुप्ता (२८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर विशाल जयस्वाल (३५) आणि परवेश जयस्वाल (४०) यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान ही घटना नेमकी गॅस गळती की अन्न विषबाधा यामुळे झाली. याचे मात्र गूढ वाढले असून ठाणे पोलीस तपास करीत आहेत.

दिवा पूर्व येथील आशापुरा माता को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील तळ मजल्यावरील एका घरातून उग्र वास येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर घराची पाहणी केली असता तिघेही बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच गोविंद गुप्ता यांचा मृत्यू झाला. तिघेही सँडविच विक्रीचा व्यवसाय करीत असून मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यवसायातील खाद्यपदार्थामुळे विषबाधा झाली का, घरातील गॅस गळतीमुळे हा प्रकार घडला की, अन्य कोणत्या कारणामुळे तिघांची प्रकृती बिघडली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

तपासासाठी फॉरेन्सिक टीमने घेतले नमुने

घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने स्थळाची पाहणी केली. घरातील विविध खाद्यपदार्थ, पाणी तसेच इतर संशयित वस्तूंचे नमुने घेण्यात आले आहेत. घरात आढळलेल्या प्रत्येक खाद्यपदार्थाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या नमुन्यांच्या अहवालानंतर विषबाधेचे तर वैद्यकीय अहवालातून या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.