
ब्रिटिश राजघराण्याशी संबंधित एक अत्यंत खळबळजनक बातमी सध्या जगभरात चर्चेत आहे. प्रिन्सेस डायना यांचे बंधू चार्ल्स स्पेन्सर यांच्या ‘स्वॉन साँग: डायना, माय सिस्टर’ या आत्मचरित्रातील दाव्यांनी एकच वाद निर्माण केला आहे. ब्रिटनमध्ये हे पुस्तक खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली असून, प्रकाशित होताच ते ॲमेझॉनच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीत शीर्षस्थानी पोहोचले आहे.
चार्ल्स स्पेन्सर यांनी पुस्तकात दावा केला आहे की, प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूनंतर लगेचच जेव्हा त्यांनी तत्कालीन प्रिन्स चार्ल्स (सध्याचे किंग चार्ल्स तिसरे) यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाचा लवलेश देखील नव्हता. उलट ते आनंदी आणि उत्साही वाटत होते. स्पेन्सर यांच्या मते, ते एखाद्या लॉटरी विजेत्याच्या आविर्भावात बोलत होते आणि अगदी भारावून गेल्यासारखे वाटत होते. डायनाच्या मृत्यूमुळे आपला खऱ्या प्रेमाशी लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला या दृष्टीने प्रिन्स चार्ल्स पाहत होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या वाढत्या वादाची गंभीर दखल घेत बकिंगहॅम पॅलेसने तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. पॅलेसने स्पष्ट केले आहे की, कुटुंबातील सदस्याच्या निधनामुळे होणाऱ्या दुःखाची राजांना जाणीव आहे.दुःखात माणसाचे विचार गोंधळू शकतात असे सांगत पॅलेसने राजाचे समर्थन केले आणि त्यांना या वादापासून दूर ठेवले.
दुसरीकडे, चार्ल्स स्पेन्सर यांनी आपण इतिहासाचे प्रत्यक्षदर्शी म्हणून आणि सत्य लोकांसमोर आणण्यासाठीच हे पुस्तक लिहिल्याचे म्हटले आहे. मात्र, डायनाच्या मृत्यूनंतर तब्बल एकोणतीस वर्षांनी हे पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा वाद केवळ एका पुस्तकापुरता मर्यादित नसून, तो ब्रिटिश राजघराण्याच्या त्या जुन्या आणि संवेदनशील भूतकाळाशी जोडलेला आहे, ज्यातून राजघराणे अजूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

























































