
देशाच्या सीमेवर सेवा बजावून सुट्टीसाठी आपल्या घरी परतणाऱ्या २९ वर्षीय जवानाची टोळक्याने बेदम मारहाण करून हत्या केली. मिझोराममधील कोलासिब जिल्ह्यात ही घटना घडली असून या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
झकेरिया लालहरियातलुआंगा (वय २९) असे हत्या झालेल्या जवानाचे नाव आहे. ते ‘आसाम रेजिमेंट’मध्ये कार्यरत होते आणि सध्या जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे तैनात होते. २० सप्टेंबर रोजी झकेरिया लेंगपुई विमानतळावर उतरल्यानंतर आपला मित्र जॉन लालतानपुईया याच्यासोबत त्याच्या ट्रकने न्यू बुईलम या आपल्या गावाकडे जात होते.
पोलिसांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बुआलपुई आणि थिंगदौल दरम्यान खराब रस्त्यामुळे समोरून येणाऱ्या एका ट्रकवाल्यासोबत चुकीच्या बाजूने वाहन चालवण्यावरून किरकोळ वाद झाला. जॉन त्या ट्रक चालकाला थांबवून समजावून सांगत असतानाच, जवळच असलेल्या पिकनिक रिसॉर्टवरून परतणाऱ्या एका स्थानिक हॉकी संघातील सुमारे २० तरुण पिकअप ट्रकमधून तिथे पोहोचले.
विजय साजरा करून परतणारे हे तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आहे. त्यांनी कोणत्याही कारणाशिवाय जॉनला ट्रकमधून बाहेर ओढून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी जेव्हा जवान झकेरिया यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या जमावाने त्यांच्यावरही तुटून पडत प्राणघातक हल्ला केला. या बेदम मारहाणीत झकेरिया यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र जॉन जखमी झाला. गोंधळ ऐकून धावून आलेला त्यांचा आणखी एक मित्र लालछाविलियाना यालाही मारहाण करण्यात आली.
घरी पोहोचण्यापूर्वी आईशी झालेला शेवटचा संवाद
झकेरिया यांच्या ६० वर्षीय आई लालथाझोवी या घरी त्यांची वाट पाहत असतानाच त्यांच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचली. या घटनेच्या अवघ्या काही वेळापूर्वीच झकेरियाशी त्यांचे फोनवर बोलणे झाले होते. त्याने संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत घरी पोहोचणार असल्याचे सांगितले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी तो न आल्याने कुटुंबीयांनी पुन्हा संपर्क साधला असता, रस्त्याची स्थिती खराब असल्याने उशीर होत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर काहीच वेळात त्याच्या मित्राने फोन करून या भीषण घटनेची माहिती दिली.
“देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असलेला तरुण जेव्हा आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी सुट्टीवर येतो, तेव्हा त्याला रस्त्यावरील गुंड घरी पोहोचण्याआधीच मारहाण करून ठार करतात, यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाही,” अशा शब्दांत आईने तीव्र आक्रोश व्यक्त केला. त्यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची आणि मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे.


























































