सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ याबाबत कारवाई करणार का? खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसचे नेते, खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी SIR प्रक्रियेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. SIR प्रक्रियेमुळे लाखो मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावला गेल्याचा आणि त्याचा कथित फायदा एका राजकीय पक्षाला मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे, असेही बॅनर्जी यांनी म्हटले.

अभिषेक बॅनर्जी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, “मुख्य निवडणूक आयुक्तांना तातडीने हटवले पाहिजे आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीचे आदेश दिले पाहिजेत.” लाखो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे आणि त्याचा कथित फायदा एका राजकीय पक्षाला मिळणे हे लोकशाहीच्या मूलभूत आधारालाच धक्का देणारे असल्याचे त्यांनी म्हटले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर INDIA आघाडीतील सर्व विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश (CJI) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली होती, असा दावाही बॅनर्जी यांनी केला. मात्र, या आरोपांची योग्य पद्धतीने चौकशी किंवा आवश्यक ती छाननी करण्यात आली नाही, असे त्यांनी म्हटले.

लोकशाही प्रक्रियेशी संबंधित गंभीर प्रश्न वारंवार उपस्थित केले जात असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर त्यातून संस्थेच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण होतात, असा दावा बॅनर्जी यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. “याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयावर येते. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ याबाबत कारवाई करणार का?”, असा सवाल अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी केला.

अभिषेक बॅनर्जी यांची ही मागणी द इंडियन एक्स्प्रेसच्या SIR प्रक्रियेवरील वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आली आहे. या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी SIR आणि मतदार याद्यांशी संबंधित काही निर्णयांवर आक्षेप नोंदवले होते.