विश्वास कोणावर ठेवायचा? ECI मधील फुटीवरून सुप्रिया सुळेंची सर्वपक्षीय बैठकीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशेष सखोल पुनरिक्षण SIR प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी आक्षेप घेतल्याच्या इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानंतर राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातच मतभेद असल्याचे समोर आले. आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात न घेता किंवा त्यांचा विरोध डावलून मुख्य आयुक्तांकडून निर्णय घेतले जात असल्याची थेट तक्रार संधू आणि जोशी यांनी कॅबिनेट सचिवांकडे केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस( शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी EC तील मतभेदांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी या सर्व घडामोडींवरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. मला आश्चर्य वाटत आहे, धक्काही बसला आहे. आमच्यावर अन्याय झाला. उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला. राजकीय मुद्दा म्हणून ते बाजूला ठेऊयात. पण सामान्यांच्या घटनात्मक अधिकारात गल्लत होत असेल तर ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे. हा विषय आपण खूप गांभीर्याने घेतला पाहिजे, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली आहे. मला या प्रकरणात राजकारण आणायचंच नाही. पण हा अतिशय चिंताजनक, एका लोकशाहीसाठी घातक विषय झालेला आहे. त्याच्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की या बाबतीत सगळ्या पक्षांना विश्वासात घेऊन एक तातडीने ऑल पार्टी मीटिंग घ्यावी आणि या देशाच्या हितासाठी मनमोकळेपणाने चर्चा व्हावी. निवडणूक आयोगावरील जे आरोप आहेत. त्या संस्थेतील लोक हे आरोप करत आहेत. ही सिस्टिमच कोसळत असेल तर कुणावर विश्वास ठेवावा असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

“…त्यांनी नैतिकता दाखवली पाहिजे”

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आयुक्त यांनी राजीनामा द्यावा का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी नैतिकता दाखवलीच पाहिजे असे सांगितले. ज्ञानेश कुमारांच्या कामावरती यापूर्वी अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे जर आरोप-प्रत्यारोप झाले तर नैतिकता दाखवलीच पाहिजे. या विषयात तथ्य आहे का नाही याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. हा फक्त राजकीय विषय नाही, हा देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकाराचा विषय आहे. त्याच्यामुळे हा वैयक्तिक मुद्दा नसून राष्ट्रीय मुद्दा बनला असल्याचे सुर्पिया सुळे यांनी नमूद केले.

‘इंडिया’ आघाडीत या प्रकरणावर चर्चा होईल, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. कारण आजच ही बातमी आली आहे आणि आम्हाला सगळ्यांना धक्का बसला आहे. कुठल्याही एका भारतीयाला आपल्या संविधानाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या भाषांचा सार्थ अभिमान आहे. त्या संविधानावर विश्वास ठेवूनच हा देश चाललाय. अशा परिस्थितीमध्ये ती बातमी येणं, ज्याच्याबद्दल दबक्या आवाजात लोकं बोलत होते, पण ते आज ज्या पद्धतीने बाहेर आलेलं आहे, हे खूप खूप म्हणजे दुःख देणारं आहे, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

“आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे”

महाराष्ट्रामध्ये शेतकरी दुष्काळात होरपळून निघालाय. मराठवाडा, विदर्भ आणि इतर पश्चिम महाराष्ट्रातल्याही काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती खूप भीषण आहे. दुष्काळ हा अतिशय संवेदनशील विषय असतो. त्यामुळे आम्हाला त्याच्यात राजकारण आणायच नाहीये. त्यामुळे उशिरा का होईना मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे मंत्री बांधावर जाणार आहेत. शरद पवार यांच्या पत्रानंतर हे दौरे सुरू झाले आहेत. आजपासून रोहित पवार, राजेश टोपे राज्याच्या दौऱ्यावर आहेत, जयंतराव, अनिल देशमुख सलील देशमुख बांधावर गेले आहेत. उद्धवजी स्वतः जाऊन आले. अंबादास दानवे देखील आज फिल्डवर आहेत. विरोधी पक्ष म्हणून नाही हो, माणुसकी म्हणून, एक नैतिकता म्हणून सगळे सहकारी आज फिल्डवर आहेत. आता महाराष्ट्र सरकारचे मंत्री आजपासून जातायत. मी त्याचं स्वागत करते. पण याच्यातून ठोस काहीतरी शेतकऱ्यांच्या पदरात पडलं पाहिजे, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली. तसचे पंचनामे तातडीने झालेच पाहिजेत. मला वाटतं दुष्काळाच्या वेळी कुठलंही राजकारणं न करता आपण सगळ्यांनी मिळून तातडीने महाराष्ट्रातल्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, हा तो दिवस आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

केंद्रीय निवडणूक आयोगात फूट; ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात सहकाऱ्यांचा 14 वेळा आक्षेप, कॅबिनेट सचिवांकडे तक्रार