
महाराष्ट्रातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. शेतांना बॅरिकेड्स लावून दौरे केल्यामुळे सरकार ग्राउंड रिॲलिटीपासून कोसो दूर राहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत देणार का, असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडिया साईट ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ पाहणी दौरा सुरू केल्याबद्दल आभार मानत त्यांनी, शेतांना बॅरिकेड्स लावून वस्तुस्थिती कधीच समजत नाही, असे म्हटले आहे. मोठ्या व्यक्तींना केव्हाही भेटणारे मुख्यमंत्री जर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी बॅरिकेड्स लावत असतील, तर याचा अर्थ एकतर सरकारचा सर्वसामान्य जनतेवर विश्वास राहिलेला नाही किंवा जनतेचा सरकारवर विश्वास उरलेला नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री साहेबांनी दुष्काळ पाहणी दौरा सुरू केला, याबद्दल त्यांचे आभार. परंतु शेतांना बॅरिकेड्स लावून मुख्यमंत्री साहेब दौरे करत असतील, तर वस्तुस्थिती समजणार आहे का? या बॅरिकेड्समुळेच ग्राउंड रिॲलिटीपासून हे सरकार कोसो दूर आहे.
मोठमोठ्यांना केव्हाही भेटणारे मुख्यमंत्री साहेब… pic.twitter.com/nU2NAbAHzT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 23, 2026
मुळात अशा बॅरिकेड्सच्या अडथळ्यांच्या दौऱ्यांची गरजच नसून, सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार आणि शेतमजुरांना 25 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा आजच करावी, अशी आक्रमक मागणी रोहित पवार यांनी केली आहे.






























































