
शिकण्याला आणि जिद्दीला वयाची कोणतीही मर्यादा नसते हे हरियाणातील सिरसा येथील 85 वर्षांच्या लालचंद गोदारा यांनी सिद्ध करून दाखवले आहे. देशसेवेसाठी तरुणपणी इयत्ता आठवीनंतर शिक्षण सोडून हिंदुस्थानी सैन्यात भरती झालेल्या आणि देशासाठी तीन महत्त्वाची युद्धे लढलेल्या माजी सैनिकाने वयाच्या 85 व्या वर्षी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात एम.ए.ची पदवी उत्तीर्ण केली आहे.
लालचंद गोदारा हे 1961-62 मध्ये इयत्ता आठवीत असतानाच सैन्यात भरती झाले होते. त्यांनी 1962 चे हिंदुस्थान-चीन युद्ध, तसेच 1965 आणि 1971 ची हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धे या तिन्ही युद्धांवेळी प्रत्यक्ष रणांगणावर सेवा बजावली. मात्र दहावी उत्तीर्ण नसल्यामुळे सैन्यात त्यांना पदोन्नती मिळू शकली नव्हती. सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी हरयाणा परिवहन विभागात’यार्ड मास्तर म्हणून काम केले आणि 2002 मध्ये तेथून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी धावणे व अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भाग घेत अनेक पदकेही पटकावली.
गोदारा यांना बालपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती, परंतु परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांच्या नातवंडांनी त्यांना पुन्हा शिक्षण सुरू करण्याचा आग्रह धरला. नात नाव्या हिचे बोलणे त्यांना चांगलेच जिव्हारी लागले आणि त्यांनी आता शिक्षणाचे युद्धही जिंकण्याचा पण केला. त्यांनी आधी 2023 मध्ये पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर एम.ए.साठी प्रवेश घेतला.
कोणतीही खासगी शिकवणी न लावता गोदारा यांनी घरच्या घरीच दररोज तासनतास अभ्यास केला. अभ्यासात काही अडचण आल्यास नात नाव्या त्यांना मदत करायची. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी एम.ए.ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. मी रणांगणावर युद्धे लढलो आहे, त्यामुळे अभ्यासाचा थकवा येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.
आता पीएचडीचा ध्यास
85 व्या वर्षीही दररोज सायकल चालवणारे आणि अनेक किलोमीटर पायी चालणारे गोदारा एम.ए.वरच थांबणार नाहीत. या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून, आता राज्यशास्त्र विषयात पी.एचडी करण्याचा त्यांचा मानस आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.



























































