गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता, रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात झालेली अलोट गर्दी, विसर्जनाचा चोख बंदोबस्त आणि वाहतूक नियमनाचे प्रचंड आव्हान असतानाही चिपळूण पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिद्ध करत एका रिक्षाचालकाचा गहाळ झालेला मोबाईल अवघ्या काही दिवसांत शोधून काढला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या हस्ते हा फोन संबंधित चालकाकडे सुपूर्द करण्यात आला असून, सणासुदीच्या धामधुमीतही दाखवलेल्या या तत्परतेबद्दल पोलिसांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

चिंचनाका येथील स्टेट बँक रिक्षा स्टँडवर व्यवसाय करणारे अविनाश आत्माराम कदम यांचा मोबाईल १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी हरवला होता. सणोत्सवाच्या काळात पोलीस यंत्रणा प्रचंड व्यस्त असल्याचे माहिती असूनही कदम यांनी तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. या अर्जाची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, सहायक पोलीस उपनिरीक्षक अमोल यादव, हवालदार संतोष शिंदे, वृषाला शेटकर, संदीप माणके, रोशन पवार आणि महिला कॉन्स्टेबल रहाटे यांच्या पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे वेगाने शोधमोहीम राबवून हा फोन हस्तगत केला. आपला फोन परत मिळाल्यानंतर कदम यांनी चिपळूण पोलिसांचे आभार मानले.

विशेष बाब म्हणजे, चिपळूण पोलिसांनी गेल्या चार महिन्यांत तब्बल १३० हून अधिक हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून दिले आहेत. त्यामुळे नागरिकांचा फोन गहाळ झाल्यास त्यांनी न घाबरता तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखतानाच सामान्य नागरिकांच्या समस्यांना सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या पोलिसांच्या या भूमिकेमुळे जनमानसातील खाकी वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.