पुराच्या पाण्यात मासेमारी केली, मग रुळ ओलांडताना एक्सप्रेसने धडक दिली; चौघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुराच्या पाण्यात मासेमारी करायला गेलेल्या पाच मित्रांना एक्सप्रेसने धडक दिली. या धडकेत चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात ही घटना घडली. जखमी तरुणाला उपचारासाठी टेकली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीकाकुलम जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळामुळे परिसरात पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात मासेमारी करण्यासाठी हे तरूण गेले होते. मासे पकडल्यानंतर टेकली विभागातील रविवलसाजवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना राजधानी एक्सप्रेसने पाच जणांना धडक दिली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.

विशाखर राव, दिलीप, शरथ आणि शिवा अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. सलमान राजू नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर, स्थानिक आणि अधिकाऱ्यांनी जखमी तरुणांना उपचारासाठी तातडीने टेकली जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, हे चारही तरुण इंटरमिजिएटचे विद्यार्थी होते आणि टेकली येथील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या सरकारी वसतिगृहात राहत होते.