
एसआयआर प्रक्रियेबाबत समोर आलेल्या खळबळजनक अहवालानंतर आता जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “जर हा संविधानावरील हल्ला नसेल, तर मग काय आहे?” असा अत्यंत संतप्त सवाल ओमर अब्दुल्ला यांनी विचारला आहे.
नुकत्याच समोर आलेल्या एका माध्यम अहवालानुसार, मतदार यादीत नवीन मतदारांची नावे जोडणे आणि वगळणे या एसआयआर प्रक्रियेदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आयोगातील इतर दोन आयुक्तांना अंधारात ठेवून सर्व निर्णय परस्पर आणि एकतर्फी घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत अब्दुल्ला यांनी हा देशाच्या लोकशाहीसाठी आणि नागरिकांच्या मतदानाच्या घटनात्मक अधिकारासाठी अत्यंत धोक्याचा इशारा असल्याचे म्हटले आहे.
एखाद्या सर्वोच्च आणि स्वायत्त संस्थेतील दोन आयुक्तांनाच आयोगाच्या नावे घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची अजिबात कल्पना नसणे, ही केवळ एक अंतर्गत किंवा प्रशासकीय बाब म्हणून सोडून देता येणार नाही, तर हा हिंदुस्थानी लोकशाहीवर झालेला अत्यंत गंभीर आघात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थेने कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने काम करणे अपेक्षित असते. मात्र एकाच व्यक्तीने सर्व निर्णय प्रक्रियेवर नियंत्रण मिळवल्याने संस्थेची विश्वासार्हता पूर्णपणे धोक्यात आल्याचे अब्दुल्ला म्हणाले.




























































