
एसआयआर प्रक्रियेवरून समोर आलेल्या एका अहवालानंतर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी मोठी मागणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या बिहार आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका नव्याने घेण्यात याव्यात, अशी मागणी यादव यांनी केली आहे.
इंडियन एक्सप्रेसने एसआयआर प्रक्रियेबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर बुधवारी तेजस्वी यादव यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देशातील घटनात्मक संस्था उद्ध्वस्त करत असल्याचा गंभीर आरोप तेजस्वी यादव यांनी केला. “आज प्रसिद्ध झालेल्या अहवालातून अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र निवडणूक आयोग यावर गप्प आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी जे लिहून दिले आहे, तेच आयोगाकडून समोर आले आहे,” अशी टीका यादव यांनी केली. बिहार आणि बंगालमधील निवडणुकांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा दावा करत, या दोन्ही राज्यांमध्ये नव्याने निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.




























































