
गणपतीची आरती सुरू असताना धर्मशाळेची बाल्कनी कोसळली. या घटनेनंतर जीव वाचवण्यासाठी भाविकांची पळापळ झाल्याने चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला असून 30 ते 35 भाविक जखमी झाले आहेत. जखमींपैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे बुधवारी मंगल आरतीदरम्यान हा अपघात घडला. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील कोतवाली भागातील पंजाबी धर्मशाळेत ही घटना घडली. जेथे अपघात झाला, तिथेच गणपतीचा मंडप उभारण्यात आला होता.
गणेशोत्सवानिमित्त पंजाबी धर्मशाळेत सुमारे दीड फूट उंचीच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. बुधवारी, स्थानिक लोक नेहमीप्रमाणे पूजा आणि प्रार्थना करत होते. दुपारी साधारण साडेबारा वाजता आरतीची तयारी सुरू होती. त्यात सहभागी होण्यासाठी धर्मशाळेत मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष भाविक उपस्थित होते.
पंडालचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी आयोजकांनी बाल्कनीला ताडपत्री बांधली होती. आरती सुरू असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मंडपावर ठेवलेल्या ताडपत्रीवर पावसाचे पाणी साचू लागले. पाण्याच्या वाढलेल्या वजनामुळे तिसऱ्या मजल्यावरील कठडा ताडपत्रीसह तुटला आणि खाली असलेल्या भाविकांवर कोसळला.
घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आणि सर्वांना बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राजा गणपती आर, पोलीस अधीक्षक अंकुर अग्रवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी आयुष चौधरी आणि इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील उपचारासाठी काही जखमींना लखनौ येथे पाठवण्यात आले.


























































