
आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, आम्ही कर्जमुक्ती करू, आम्ही दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करू. दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करू. या नुसत्या हवेतल्या गोष्टी आहेत. पण दुष्काळाच्या प्रश्नावर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन हे तत्काळ घेतलं जायला पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शेतकरी हे विचारताहेत की आम्हाला मदत कधी देणार? तुमचं डबल इंजिन सरकार आहे. इकडेही सरकार आहे तिकडेही सरकार आहे. तुमचं डबल इंजिन नुसतं वाफ सोडतंय! तर तत्काळ विधिमंडळाचं विशेष अधिवेशन हे घेतलं गेलंच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयुक्तांच्या मनमानीबद्दल कालची पत्रकार परिषद होती. त्याच्याबद्दल जे बोलायचं ते काल बोललोय. त्याच्यानंतर संपूर्ण देशामध्ये आता हा विषय गरम झाला आहे आणि नुसताच गरम नाही तर तो पेटल्याशिवाय राहणार नाही. कालच्या पत्रकार परिषदेदरम्यान काही दुष्काळाचे प्रश्न आले होते. आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की दुष्काळाबद्दल आपण उद्या बोलू. त्यानुसार दुष्काळाबाबत बोलणार आहे. याचं कारण असं की गेली काही वर्षे एकतर अतिवृष्टी, पूर या अशा सगळ्या नैसर्गिक संकटाला महाराष्ट्र देत आलेला आहे. गेल्यावर्षी मी मराठवाड्यात गेलो होतो. कारण मराठवाड्यात गेल्या वर्षी सरत्या पावसाने धुमाकूळ घातला होता. पिकंच्या पिकं सगळी सडून गेली होती. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या होत्या. भांडीकुंडी, मुलांची शालेय शिक्षणाची सगळी साहित्य वह्या-पुस्तक सगळंच वाहून गेलं होतं. ते विचित्र संकट होतं. त्याही वेळेला मी दौरा केला होता. आणि कर्जमुक्तीची मागणी केली होती. आता तेव्हा सगळं वातावरण हे गरम होत होतं. आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज ३१ हजार कोटींचं पॅकेज हे गेल्या वर्षी सरकारने जाहीर केलं होतं. त्याच्यामध्ये ज्यांची जमीन खरवडून गेली होती त्यांना हेक्टरी साडेतीन लाख रुपये त्यांनी जाहीर केले होते. बऱ्याच गोष्टी त्याच्या होत्या. पहिला प्रश्न असा आहे की, खरोखर त्यातली किती मदत ही प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात पोहोचलेली आहे? याची माहिती महाराष्ट्राला पाहिजे. त्याच्यानंतर या वर्षी साधारणतः मोसमाच्या सुरुवातीलाच आपल्या राज्यात दुष्काळ पडू शकतो असा एक अंदाज हवामान खात्याकडून आणि जागतिक अभ्यास केंद्रांनी वर्तवली होती. मग प्रश्न असा येतो की, ही शक्यता लक्षात घेऊन आपण दुष्काळ निवारण्यासाठी तेव्हापासून काय पावलं उचलली होती का? साधारण आपण वाट बघतो की, एवढ्या काळामध्ये जर का पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याला दुबार, तिसऱ्यांदा पेरणी करावी लागते. यावेळची हालत ही अत्यंत भयंकर आहे. मी प्रार्थना करतो देवाकडे की, निदान सरता पाऊस पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्या इतपत तरी पडू दे. धरणं भरू दे, शेतकऱ्यांच्या विहिरी भरू दे. जेणे करून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हा सुटेल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. आणि त्याच बरोबरीने रब्बीचा जो हंगाम सुरू होईल येत्या काही दिवसानंतर त्याला पुरेसं पाणी मिळू दे अशी मी देवाच्या चरणी प्रर्थना करतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आता जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जातेय. पण पाऊस तर काही पडत नाहीये. आणि आता पाऊस जरी पडला तरी या दुष्काळाने ही पिकं करपून गेली आहेत त्यांना कोंब काही येणार नाहीत. म्हणजेच काय की खरिपाचा हंगाम जो होता तो शेतकऱ्याच्या हातातून पूर्णपणे गेलेला आहे. त्याच्या डोक्यावर कर्ज चढलेलं आहे. मी स्वतः अनेकदा शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलेलो आहे. अगदी गेल्या आठड्यात सुद्धा मराठवाडा मुक्तिदिनाच्या दिवशी मी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलो होतो. शिवसेनेच्या तर्फे मराठवाड्यामध्ये जिल्हा पातळीवरती तुमसे ना हो पायेगा… या माध्यमातून एक आंदोलन केलं गेलं होतं. त्याच्यात अनेक मागण्या केल्या गेल्या की, शेतकऱ्याला किती मदत केली गेली पाहिजे, काय गेलं पाहिजे? आम्ही नुसती आगपाखड नाही करत आहोत, आम्ही सूचना सुद्धा करून इच्छितो, मदत सुद्धा करू इच्छितो शेतकऱ्याला. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेच बांधावर गेले होते. त्याचे फोटो आलेत. शेतकरी रडतोय त्याला जवळ घेताय. आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, आम्ही असं करणार नाही, आम्ही तत्काळ असं करू. पण पोरांची लग्न जमेना, आम्हाला पाणी द्या हे शेतकरी म्हणतोय. जो शेतकरी आपला अन्नदाता आहे तो शेतकरी गेल्या वर्षी जेव्हा अतिवृष्टी झाली होती तेव्हा माझ्याकडे धायमोकलून रडत होता. मी काही करू शकत नव्हतो. कारण माझ्या हातामध्ये काहीच अधिकार नाही. पण तो विचारत होता की आम्ही खायचं काय? हे दौरे जे चाललेले आहेत ते दौरे करा, शेतकऱ्याला जरूर धीर द्या. पण जे मी १७ सप्टेंबरला गेल्यानंतर सांगितलं होतं की, कारण तेव्हा, मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की, ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे सुरू होतील. कशाची वाट बघताय? ५ ऑक्टोबर काय? शेतकरी इकडे त्याचे प्राण कंठाशी आलेले आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुलांची लग्न जुळत नाहीये. सगळचं वाताहत झालेली आहे. डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे. आणि गेल्या १७ तारखेपासून ५ ऑक्टोबरपर्यंत… आज २४ तारखी आहे. अजूनही कशाचा काय प्रश्न नाही. आज बातमी आलेली आहे की आम्ही दोन-तीन दिवसांत याबाबत काय ती घोषणा करू. परत दोन-तीन दिवस कशाला? मग तुम्ही कॅबिनेट बैठक घेताय कशाला? कॅबिनेट बैठकीत होतंय काय? हे दुष्काळी दौरे नुसते काजू-बदाम खाण्यासाठी आहेत का? दुष्काळी दौरे जे तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये सोबत जे काही अधिकारी, तुमचे लोकप्रतिनिधी, तुमचे सहकारी मंत्री आहेत त्यांना खरोखर शेतकऱ्याच्या दुःखाशी देणं-घेणं आहे की नाही? हे आम्हाला काही कळत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
सुपर एल निनोमुळे जगभरात साडेचार लाख आणि आपल्या देशात जवळपास सोळा हजार मृत्यू होण्याचा धोका आहे. आता हे संकट रोखायचं कसं हे आपल्या कोणाच्या हातात नाहीये. पण संकटाला तोंड देण्याची तयारी ही सर्वांना सोबत घेऊन आम्ही काय करणार आहोत? याच्या सरकार कोणालाच काही सांगायला तयार नाही. कालच्या दौऱ्याबद्दल बातम्या आलेल्या आहेत. काही काही ठिकाणचे दौरे हे १०-१० मिनिटांत उरकले आहेत. आमचे आमदार कैलास पाटील आणि प्रवीण स्वामी हे धारशिवमध्ये सर्व शेतकऱ्यांसोबत उभे होते. त्यांना दोरखंडाने अडवलं गेलं. मग तुम्ही तिकडे कोणाला भेटायला जाताय? दुसरी एक बातमी की, भाजपच्याच कार्यकर्त्यांना ते भेटले. मग हे सगळे तुम्ही देखावे का करतात? कशासाठी करतात? म्हणजे कोणाला फसवताय? सरकार जर का एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीवर अवलंबून नसेल तर का घोषित कर नाही दुष्काळ? बरं दुष्काळ कधी जाहीर करावा? निकष काय? हे पेपरमध्ये येतंय. आता निकष काय तिकडे सगळं सुकलेलं दिसतंय. समोर दिसतंय की शेतकरी आज पूर्णपणे संपलेला आहे. त्याचं पिक जळून खाक झालेलं आहे आणि अशा तुम्ही कोणते निकष बघताय? कोणाची वाट बघताय? काय म्हणजे तुम्हाला सगळं कागदावर आल्याशिवाय कळत नाही का आल्यानंतर सुद्धा तुमचं काही मन वळत नाही. काय नेमकं झालंय तरी काय? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
कर्जमाफीची घोषणा झाली, याद्यांवरती याद्या येत आहेत. खरोखर किती शेतकऱ्यांची माफी झालेली आहे? माफी हा त्यांचा शब्द आहे कर्जमुक्ती हा माझा शब्द आहे. पण त्यांच्या भाषेत बोलतोय म्हणून मी कर्जमाफी बोलतोय की, आकडे जाहीर होताहेत. आज सहा हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. उद्या आणखी दहा हजार शेतकऱ्यांची होईल. आणि एवढी रक्कम दिली गेली. ही रक्कम खरंच शेतकऱ्यांच्या हातात मिळाली आहे का? कारण फडणवीससाहेब म्हणताहेत की बँकांचा फायदा होणारी आमची कर्जमाफी नसेल तर शेतकऱ्यांचा फायदा होणारी ही कर्जमाफी किती शेतकऱ्यांच्या हतात मिळाली आहे? याचा काही आढावा आहे का? गावानुसार तुम्ही अंदाज घेतला आहे का? कोण तपासतं हे सगळं? जसं आम्ही कर्जमुक्ती केली होती आज सुद्धा जिथे-जिथे जाल तिथे सगळे शेतकरी सांगतात की १५ दिवसांत कोणताही निकष न तपासता सरसकट सगळ्यांची दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती केली होती. आता अहिल्यादेवी होळकर ही जी कर्जमाफी त्यांनी केलेली आहे त्या योजनेच्या अंतर्गत किती शेतकऱ्यांची खरंच कर्जमाफी झाली आहे? या पुरावा काय? नुसत्या याद्या जाहीर होताहेत. होतंय की नाही कल्पना नाही? आता जे बोललो त्याच्या दोन गोष्टी आहेत एक गेल्या वर्षी जाहीर केलेलं पॅकेज किती शेतकऱ्यांना मिळालेलं आहे? आणि नंबर दोन… आता तुम्ही जाहीर केलेली कर्जमाफीची योजना त्यानुसार किती शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे? याची यादी द्या. तिसरा मुद्दा कर्जमाफीबरोबर पिक विम्याचा. एक रुपयात पिक विमा ही योजना सरकारने गुंडाळली आहे. आणि ती गुंडाळल्यानंतर जवळपास दरवर्षी जेवढे शेतकरी पिकविम्यासाठी आपली नोंदणी करतात त्यापैकी अर्ध्याहून जास्त शेतकऱ्यांनी पिकविम्यासाठी नोंदणी केलीच नाहीये. एकवर्षी साधारणतः पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी पिकविम्यासाठी नोंदणी केली होती. ही योजना रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांची ही संख्या ७० लाखांवर आली आहे. म्हणजे अर्ध्याहून अधिक शेतकरी असेच गेले. याचं कारण असं की पिकविमा योजना ही सुद्धा एक थट्टा आहे. ज्यावेळेला नुकसान होतं त्यावेळेला सुद्धा यांचे पंचनामे माग चालू राहतात. ह्या पिकविम्याबद्दल जे प्रमुख चार ट्रिगर होते ते चार ट्रिगर यांनी काढून टाकले. म्हणजे काय की विमा कंपन्यांची धन होते. केंद्र सरकार, राज्य सरकार असेल यांच्याकडनं ही रक्कम जमा केली जाते मात्र पिकविमा कंपन्यांच्या एका मनमानीमुळे शेतकऱ्यांचं नुकसानच ते मानत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला कुठे पाच रुपयाचा चेक, कुठे आठ रुपयाचा, कुठे २१ रुपयाचा चेक म्हणजे ही उघड उघड आपल्या अन्नदात्याची थट्टा आहे. हे सुद्धा जे काही गुन्हेगार आहेत, या गुन्हेगारांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. पण सगळेच गुन्हेगार आपण शोधत बसलो तर शेतकऱ्याची वाट लागून जायची. आणि म्हणून पिकविमा याच्याबद्दल खरं काय? योजना चालू आहे, बंद आहे, कोणत्या आधारावरती तुम्ही कधी पंचनामे करणार? शेतकऱ्याची कर्जमाफी कधी होणार? झालेली नुकसान भरपाई कधी मिळणार? कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जमाफी बनावट खाती बंद करण्यासाठी सरकारने पावलं उचलली आहेत. जसं लाडकी बहीण जवळपास ९२ लाख महिलांची नावं आता बोगस म्हणून उडवून टाकली. म्हणजे त्याचं सुद्धा एसआयआर केलं की माहिती नाही. पण ती सुद्धा त्यांनी उडवून टाकली. तसंच आता काही शेतकऱ्यांना हे सांगतील त्यांची खातीच बोगस आहेत. एवढा शेतकरी माझा नालायक नाहीये की जो कर्ज बुडवून परदेशात पळून जाईल. त्याचं कोणी नाहीये. त्याच्या दारावरती जेव्हा नोटीस लागते तेव्हा गावात आपली अब्रु जाते या एका वेदनेने तो आत्महत्या करतो. तो पळून जाणारा शेतकरी नाहीये. पण तुम्ही शेतकऱ्याची खाती बनावट किंवा बोगस हे आता काढलेलं आहे. म्हणजे ही खाती तपासणार, ती खाती तपासल्यानंतर निकष लावणार, निकष लावल्यानंतर तुमची कर्जमाफी रडतखडत कधीतरी पोहोचणार. अजूनही आम्ही त्यांच्यासोबत जेव्हा होतो तेव्हा जी काही जाहीर केलेली कर्जमाफी होती ती अजून चालू आहे. आता ही नवीन कर्जमाफी किती काळ चालेल? याची कल्पना नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
काही गोष्टी तातडीने करण्याची गरज आहे. एक तर तीन महसूल विभाग त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि वदर्भ या तीन महसूल विभागामध्ये एक सोलापूरला, एक छत्रपती संभाजीनगरला आणि एक विदर्भामध्ये तातडीने सरकारने कॅबिनेट बैठक घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याही आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूण आम्ही काय करणार आहोत? त्याच्याबद्दल ताबडतोबीने किमान दोन ते दिवसांचं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन या सरकारने बोलावलं पाहिजे. सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी तिकडे येऊ द्या. तुम्ही सभागृहात चर्चा करा. कारण सभागृहात जे काय होतं, जी काही उत्तरं दिली जातात त्याला सरकार हे बांधील असतं. आज जे काही त्यांचे जे हवाबाण हरडे सुरू आहेत. आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, आम्ही कर्जमुक्ती करू, आम्ही दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करू. दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करू. या नुसत्या हवेतल्या गोष्टी आहेत. पण अधिवेशन हे तत्काळ घेतलं जायला पाहिजे. पटकन नोटीस दिली तर अगदी पुढच्या आठवड्यात सुद्धा सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधी येतील. कारण पक्ष बघून दुष्काळ पडलेला नाही ही नैसर्गिक आपत्ती आहे. सर्व पक्षाच्या लोकप्रतिधिनिधींना शेतकरी हे विचारताहेत की आम्हाला मदत कधी देणार? तुमचं डबल इंजिन सरकार आहे. इकडेही सरकार आहे तिकडेही सरकार आहे. तुमचा मोटरमन येणार कधी? की नुसतं तुमचं डबल इंजिन नुसतं वाफ सोडतंय! तर तत्काळ विधिमंडळाचं विशेष अधिवेशन हे घेतलं गेलंच पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्याच्यानंतर तीन महसूल विभागामध्ये कॅबिनेट बैठका घेतल्या गेल्या पाहिजे की, विधिमंडळात आम्ही जे काही निर्णय घेतलेत त्यानुसार या महसूल विभागामध्ये काय-काय उपाययोजना केल्या ते सांगा. पालकमंत्री जे नुसते झेंडावंदनाची मारामारी करतात त्या पालकमंत्र्यांना सुद्धा म्हणजे जसं शेतकरी नांगराला बैल जुंपते तसं या पालकमंत्र्यांना कामाला जुंपा. बाकीचे तुमचे चोचले खूप झाले, एकदाच काय ते काजू-बदाम घ्या आणि तिकडे जिल्ह्यात जाऊन बसा. तुम्ही दुष्काळ निवारणाची तिथली पूर्ण जबाबदारी शासनाच्या वतीने घ्या, इकडे यायचं नाही तिकडेच काय ते काम करा. या सक्त ताकदीची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसैनिकांना सांगतोय, तुम्ही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करा. ज्या काही मदतीच्या नुसत्या पुड्या सोडल्या जाताहेत, ती प्रत्यक्ष मदत आपल्या गावातील शेतकऱ्यांना मिळतेय की नाही याच्यावरती लक्ष ठेवा. गावातल्या आपल्या सर्कलमध्ये किती शेतकरी येतात? त्यांची किती जमीन आहे? त्यांचा पंचनामा होतोय की नाही? त्यांचं किती नुकसान झालंय? पंचनाम्यामध्ये बरोबर पंचनामा केलाय की नाही? किती दिवसांत मदत मिळतेय? कर्जमाफी होतेय की नाही? याच्यावरती शिवसैनिकांनी लक्ष ठेवावं. मी स्वतः फिरणार आहे. आदित्य पुढच्या दोन दिवसांत जातोय. त्याच्यानंतर शिवसेनेचे सर्व नेते, सर्व पदाधिकारी हे राज्यभर जिथे-जिथे दुष्काळाची तीव्रता आहे, जिथे-जिथे गरज आहे तिथे-तिथे स्वतः या मदत केंद्राला भेटी देतील. शेतकऱ्यांना भेटी देतील आणि सरकारने जाहीर केलेली मदत ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचतेय की नाही? याची स्वतः ते दक्षता घेतील. आम्ही केवळ विरोधी पक्ष म्हणून करत नाही. शेतकऱ्याला मदत केंद्र, कारण शेतकऱ्याला काही वेळेला कळत नाहीय की या सगळ्या अटी आहेत या भरायच्या कशा, याच्यामध्ये लिहायचं काय? तर ही तांत्रिक सगळी मदत शिवसेनेकडून पुरवण्यासाठी अगदी तालुकावार, सर्कल निहाय शिवसेनेची शेतकरी मदत केंद्र ही राज्यभर सुरू करण्याच्या सूचना मी शिवसैनिकांना देतोय, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.

























































