Parbhani News पावसाने दगा दिल्याने चार एकर सोयाबीनची शेतकऱ्यांनी केली होळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांची मोठी दुरवस्था झाली असून, सोयाबीनच्या शेंगा पोकळ झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शेतातील सोयाबीन कापून खळे करण्याचा खर्चही निघणार नसल्याने कमलापूर शिवारातील शेतकऱ्यांनी तब्बल चार एकर क्षेत्रातील सोयाबीन स्वतःच जाळून टाकल्याची घटना आज रोजी घडली.

जून महिन्यात झालेल्या अल्प पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, ऊस, हळद आदी पिकांची पेरणी केली. मात्र ऑगस्ट महिन्यात पिकांना फुले व शेंगा लागण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने सोयाबीनच्या शेंगा पोकळ राहिल्या. परिणामी सोयाबीनचे दाणे बारीक झाले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

अगोदरच पेरणीसाठी कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आता वाळलेले सोयाबीन काढण्यासाठी मजुरी आणि मशीनचा खर्च करणेही परवडत नसल्याचे चित्र आहे. शेतातील उत्पादनातून कापणी, मळणीचा खर्चही निघणार नसल्याने कमलापूर येथील केशवराव गोविंदराव मोरे, व्यंकटी गोविंदराव मोरे आणि चंद्रकला व्यंकटी मोरे यांनी गट क्रमांक ४७ मधील जवळपास चार एकर क्षेत्रातील सोयाबीन आज दिवसभर जाळून टाकले. पावसाअभावी हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, शासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व पीकविमा भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.