
जय मीनाने सॉफ्ट टेनिसमध्ये हिंदुस्थानसाठी ऐतिहासिक पदक जिंकले. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत फिलिपिन्सच्या शेर्विन नुगेटचा 4-3 असा पराभव केला. सामना 3-3 असा बरोबरीत होता आणि निर्णायक गेममध्ये जय 3-5 ने मागे होता, मात्र त्याने सलग चार गुण जिंकून शानदार पुनरागमन केले आणि सामना जिंकला.
यामुळे तो उपांत्य फेरीत पोहोचला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सॉफ्ट टेनिसमधील हिंदुस्थानचे पहिले पदक निश्चित केले. पण दुखापतीमुळे जय मीनाला उपांत्य फेरीतून माघार घ्यावी लागली. यामुळे त्याचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले आणि त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पण तरीही जयने इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सॉफ्ट टेनिसमधील हे हिंदुस्थानचे पहिले पदक आहे.
क्रिकेटची आवड होती, पण…
जय मीनाचा या ऐतिहासिक क्षणापर्यंतचा प्रवास जवळजवळ योगायोगानेच सुरू झाला. लहानपणी क्रिकेटची आवड असलेल्या मीनाने मध्य प्रदेशातील देवास येथील पायनियर पब्लिक स्कूलमध्ये सॉफ्ट टेनिस खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला तो खेळाडूंना पाहत असे आणि स्वतः हा खेळ खेळण्यापूर्वी बॉल बॉय म्हणून काम करत होता. त्यानंतर 2022 मध्ये गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये पुरुष एकेरीचे सुवर्णपदक जिंकले होते.


























































