
धावण्याबरोबरच कार्यात्मक व्यायाम यांचा संगम असलेल्या आव्हानात्मक हायरॉक्स रिले या स्पर्धेत मुंबई महापालिकेच्या परिमंडळ-3 चे उपायुक्त विश्वास मोटे यांनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळेच त्यांच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला. गोरेगावच्या नेस्को संकुलात 17 ते 20 सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील 15400 खेळाडू सहभागी झाले होते.
उपायुक्त विश्वास मोटे आणि त्यांच्या संघाने या अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश मिळविले. त्यांच्या या यशामुळे महापालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्येही व्यायाम, आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत सकारात्मक संदेश गेला आहे. शारीरिक क्षमतेसोबतच शिस्त, सातत्य, आत्मविश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीतही कामगिरी करण्याची क्षमता या स्पर्धेत महत्त्वाची ठरली.
या रिले स्पर्धा प्रकारात चार जणांचा संघ असतो. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना निर्धारित क्रमाने एकूण आठ किलोमीटर धावणे आणि आठ विविध कार्यात्मक व्यायाम प्रकार पूर्ण करावे लागतात.
प्रत्येक एक किलोमीटर धावणीनंतर संबंधित व्यायामाचे आव्हान पूर्ण करावे लागते. यात स्कीएर्ग, स्लेड ढकलणे, स्लेड ओढणे, बर्पी ब्रॉड जंप, रोइंग, वजन वाहून नेणे, सँडबॅग लंजेस आणि वॉल बॉल्स यांचा समावेश असतो. स्पर्धेतील प्रत्येक टप्पा नियमांनुसार पूर्ण करणे आवश्यक असते.



























































