Asian Games 2026 – हिंदुस्थानपुढे थायलंडचे लोटांगण; महिला हॉकी संघाचा 20-1 असा दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा सुसाट गोलधमाका आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ‘ब’ गटातील सामन्यात पाहायला मिळाला. हिंदुस्थानच्या महिला संघाने थायलंडला 20-1 ने पराभूत करून आपले वर्चस्व कायम राखले. दीपिकाने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत सामन्यात नऊ गोल केले. दीपिकाचे सर्व गोल पेनल्टी कॉर्नरमधून झाले. नवनीत आणि रितुजाने हॅटट्रिक केली. बेचिराख झालेल्या थायलंडला शेवटच्या मिनिटात फक्त एक गोल करता आला.

दीपिकाने स्वतःचाच विक्रम मोडला

हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये 56 गोल केले आहेत. दीपिकाने स्वतःचाच विक्रम मोडत आशियाई क्रीडा स्पर्धेतील एकाच महिला हॉकी सामन्यात सर्वाधिक गोल करणारी खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी दीपिकाने उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आठ गोल केले होते. हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपले तिन्ही सामने जिंकले आहेत. हिंदुस्थानने यापूर्वी उझबेकिस्तान आणि इंडोनेशियाला पराभूत केले होते. आता 25 सप्टेंबरला त्यांचा सामना जपानशी होईल.

हिंदुस्थानसाठी कोणी गोल केले

दीपिकाने नऊ गोल केले (दुसऱ्या, आठव्या, नवव्या, 24, 33, 36, 39 व्या, 49 व्या आणि 57 व्या मिनिटाला). अनुभवी फॉरवर्ड नवनीत कौरने चार गोल केले (चौथ्या मिनिटाला, 29, 35 आणि 51 व्या मिनिटाला) आणि ऋतुजा पिसाळने तीन गोल केले (10, 11 आणि 47 व्या मिनिटाला). अनुभवी मिडफिल्डर नेहा (19 व्या मिनिटाला), लालरेम्सियामी (26 व्या मिनिटाला), साक्षी राणा (29 व्या मिनिटाला) आणि कर्णधार सलीमा टेटे (45 व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल केला. थायलंडचा एकमेव गोल इम्पा पुंजिराने 59 व्या मिनिटाला केला.