Asian Games 2026 – हिंदुस्थानच्या पुरुष कबड्डी संघाचे पदक निश्चित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या पुरुष कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक निश्चित केले आहे. बुधवारी तोकाई सिटिझन्स जिम्नॅशियम येथे झालेल्या गट ‘अ’ च्या सामन्यात बांगलादेशला 48-25 ने पराभूत करून हिंदुस्थानच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली गट टप्प्यातील हा हिंदुस्थानचा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी हिंदुस्थानी संघाने जपानविरुद्ध दणदणीत विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली होती. दुसऱ्या सामन्यात त्यांनी दक्षिण कोरियाला 63-31 ने पराभूत केले.

हिंदुस्थानने सामन्याच्या सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ केला आणि बांगलादेशवर दबाव कायम ठेवला. मजबूत चढाई आणि शिस्तबद्ध बचावामुळे संघाने पहिल्या सत्रात लक्षणीय आघाडी घेतली. हिंदुस्थानी खेळाडूंनी यशस्वी चढाई आणि सात बोनस गुणांच्या माध्यमातून 18 गुण मिळवले. इतकेच नाही तर संघाने बांगलादेशवर दोनदा लोणही चढवले.

कबड्डीत महिलांनी इराणला धूळ चारली

हिंदुस्थानने गट ‘अ’ च्या महिला कबड्डी सामन्यात इराणला 37-23 ने पराभूत केले. हिंदुस्थानी संघाने सुरुवातीला काहीसा डळमळीत खेळ दाखवला, पण लवकरच त्यांनी लय पकडली आणि बहुतांश वेळेस वर्चस्व राखले.