
‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्याने पोलिसांमध्ये नाराजी पसरली आहे.
पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना व्हीआयपी दर्शनाचे पास दिले जात नाहीत. डय़ुटीवर असलेल्या पोलिसांना डय़ुटी सोडून गणपती दर्शनाचीही मुभा नाही. ज्या पोलिसांनी डय़ुटीवर असताना आपल्या कुटुंबीयांसोबत ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेतले आहे त्या पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य पोलिसांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध प्रचंड नाराजी पसरली आहे. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे बंदोबस्तासाठी असलेले बहुसंख्य पोलीस गणेश दर्शनासाठी विनवणी करीत आहेत, अशी माहिती मंडळाच्या एका कार्यकर्त्याने दै. ‘सामना’ प्रतिनिधीशी बोलताना दिली. ‘लालबागचा राजा’ हा गणपती नाही, ती एक भावना आहे. त्यामुळे तिथे गर्दी ही होणारच. रोज 10-15 लाख भाविक रांगेत उभे राहून बाप्पाचे दर्शन घेतात. दिवसरात्र, रात्री-अपरात्री, ऊन-पावसात बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना व्हीआयपी पास देणे काही गैर नाही, असे हा कार्यकर्ता म्हणाला. उद्योगपती, मंत्री, राजकारण्यांना व्हीआयपी दर्शन दिले जाते. मग सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना बाप्पाचे स्पेशल दर्शन व्हावे म्हणून वरिष्ठ का मार्ग काढीत नाहीत, असा सवाल एका पोलिसाने केला, तर डय़ुटी सोडून एखादा पोलीस बाप्पांच्या दर्शनाला गेला आणि गर्दीच्या रेटय़ामुळे जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला कोण जबाबदार, असा सवाल एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केला.


























































