लेख – डिजिटल साक्षरता महत्त्वाची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दत्तप्रसाद शिरोडकर

डिजिटल साक्षरता ही केवळ तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता नाही, ती विवेकाने तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता आहे. ग्रामीण नागरिक असो, विद्यार्थी असो, महिला असो किंवा ज्येष्ठ नागरिक, प्रत्येकाला डिजिटल जगात सुरक्षितपणे वावरता आले पाहिजे. अक्षरज्ञान प्रत्येकासाठी आणि डिजिटल ज्ञान प्रत्येकाच्या हातात हा संकल्प प्रत्यक्षात उतरवला तरच डिजिटल भारत अधिक सक्षम, सुरक्षित आणि समावेशक बनेल.

साक्षरतेचा संबंध आता केवळ शैक्षणिक गुणवत्ता किंवा वाचता आले आणि लिहिता आले यापुरता मर्यादित राहिला नसून आजच्या काळात त्याचे समीकरण बदललेले आहे. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला गेला. व्यक्तीच्या विकासाबरोबरच सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे.

साक्षरता व्यक्तीला माहिती समजून घेण्याची, निर्णय घेण्याची आणि आपल्या हक्कांसाठी उभे राहण्याची क्षमता देते. डिजिटल युगात या क्षमतेला तंत्रज्ञानाच्या ज्ञानाची जोड मिळणे आवश्यक झाले आहे. साक्षरता म्हटले की अक्षर ओळखता येणे, वाचता आणि लिहिता येणे एवढाच त्याचा पारंपरिक अर्थ आपल्या मनात येतो. मात्र तंत्रज्ञानाने आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. स्मार्टफोन, इंटरनेट, डिजिटल बँकिंग, ऑनलाईन शिक्षण, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यामुळे आजच्या युगात केवळ अक्षरज्ञान पुरेसे नाही, तर डिजिटल साधनांचा सुरक्षित, जबाबदार आणि विवेकी वापर करता येणे ही आधुनिक साक्षरतेची नवी ओळख आहे. भारतात यूपीआय आणि डिजिटल पेमेंट याचे उत्तम उदाहरण म्हणजे डिजिटल साक्षरता आहे. शहरांपासून छोटय़ा गावांपर्यंत, चहाच्या टपरीपासून किराणा दुकानापर्यंत क्यूआर कोड दिसतो. गावखेडय़ातील ग्राहकसुद्धा  मोबाईलवरून काही सेपंदांत पैसे देतो आहे. मात्र डिजिटल व्यवहार करता येणे एवढेच पुरेसे नाही. एखाद्याने ‘तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी हा क्यूआर कोड स्पॅन करा’ असे सांगितल्यास पैसे मिळण्याऐवजी आपल्या खात्यातून पैसे जाऊ शकतात, हे समजणेहीसुद्धा तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे डिजिटल साक्षरतेबरोबरच आर्थिक सुरक्षिततासुद्धा  तितकीच महत्त्वाची आहे. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार हे डिजिटल साक्षरतेच्या अभावाचे गंभीर उदाहरण आहे. ‘तुमचे बँक खाते बंद होणार आहे’, ‘तुमचे केवायसी अपडेट करा’ किंवा ‘तुम्हाला बक्षीस मिळाले आहे’ अशा संदेशांसोबत बनावट लिंक पाठवली जाते. घाईघाईने लिंक उघडून बँक तपशील, पासवर्ड किंवा ओटीपी दिल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. डिजिटल साक्षर नागरिक अशा संदेशांवर त्वरित विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमातून त्याची पडताळणी करतो. ओटीपी, पासवर्ड किंवा पिन कोणालाही न देणे हा साधा नियम अनेकांना आर्थिक फसवणुकीपासून वाचवू शकतो.

डिजिटल साक्षरतेचा फायदा ग्रामीण भागालाही मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो. उदाहरणार्थ, शेतकरी मोबाईलवरून हवामानाचा अंदाज, बाजारभाव, कृषीविषयक माहिती आणि विविध सरकारी योजनांची माहिती मिळवू शकतो. पावसाचा अंदाज पाहून शेतीची कामे नियोजित करता येतात किंवा वेगवेगळ्या बाजारपेठांमधील दरांची माहिती घेऊन माल विक्रीचा निर्णय घेता येतो. मात्र सोशल मीडिया किंवा अनोळखी व्हॉट्सअॅप समूहातून मिळालेली प्रत्येक कृषीविषयक माहिती खरी असेलच असे नाही. त्यामुळे माहिती मिळवण्याबरोबरच तिची सत्यता तपासणे महत्त्वाचे आहे.

शिक्षण क्षेत्रातही डिजिटल माध्यमांनी मोठी संधी निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन व्याख्याने पाहू शकतो, ई-पुस्तके वाचू शकतो आणि विविध विषयांचा सराव करू शकतो. पूर्वी चांगल्या शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी शहरात जाण्याची गरज होती. आज इंटरनेटमुळे ज्ञानाचे जग मोठय़ा प्रमाणात सर्वांसाठी खुले झाले आहे. परंतु मोबाईलचा वापर अभ्यासाऐवजी केवळ मनोरंजनासाठी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना डिजिटल शिस्त आणि माहितीचे चिकित्सक आकलन शिकवणे गरजेचे आहे. सोशल मीडियावरील चुकीची माहिती हे डिजिटल युगातील आणखी एक मोठे आव्हान आहे. एखादा जुना व्हिडीओ नवीन घटनेचा म्हणून प्रसारित केला जातो, बनावट छायाचित्रे खरी असल्याचा दावा केला जातो किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावाने खोटे वक्तव्य व्हायरल केले जाते. अशा वेळी कोणतीही पोस्ट पुढे पाठवण्यापूर्वी तिचा स्रोत, तारीख आणि विश्वासार्ह माध्यमांमधील माहिती तपासणे आवश्यक आहे. आज ‘वाचता येणे’ इतकेच नव्हे, तर वाचलेल्या माहितीचे मूल्यमापन करता येणे हीदेखील साक्षरतेची कसोटी आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता विशेष महत्त्वाची आहे. ऑनलाईन बँकिंग, रेल्वे आरक्षण, बिल भरणे, सरकारी सेवा आणि व्हिडीओ कॉल यांसारख्या सुविधांमुळे त्यांचे जीवन सुलभ होऊ शकते. मात्र त्यांना डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याचे प्रशिक्षण देणेही तितकेच आवश्यक आहे. कुटुंबातील तरुणांनी ज्येष्ठांना मोबाईल वापर शिकवताना पासवर्ड, पिन आणि ओटीपीची गोपनीयता याबाबतही जागरूक करणे गरजेचे आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात डिजिटल साक्षरतेचा अर्थ आणखी व्यापक झाला आहे. एआयच्या मदतीने मजकूर, चित्रे आणि विविध प्रकारची माहिती काही क्षणांत तयार करता येते, परंतु एआयने दिलेली प्रत्येक माहिती अचूक असेलच असे नाही. त्यामुळे तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून न राहता माहितीची पडताळणी करण्याची सवय आवश्यक आहे.

डिजिटल साक्षरता ही केवळ तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता नाही, ती विवेकाने तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता आहे. ग्रामीण नागरिक असो, विद्यार्थी असो, महिला असो किंवा ज्येष्ठ नागरिक प्रत्येकाला डिजिटल जगात सुरक्षितपणे वावरता आले पाहिजे. अक्षरज्ञान प्रत्येकासाठी आणि डिजिटल ज्ञान प्रत्येकाच्या हातात हा संकल्प प्रत्यक्षात उतरवला तरच डिजिटल भारत अधिक सक्षम, सुरक्षित आणि समावेशक बनेल. कारण डिजिटल युगातील खरी साक्षरता म्हणजे केवळ स्क्रीनवरचे शब्द वाचणे नव्हे, तर त्यातील सत्य ओळखणे, योग्य निर्णय घेणे आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करणे होय. नाहीतर आपण या डिजिटल महाजालात केव्हा अलगद फसले जाऊ हे काही सांगता येणार नाही.