
पुणे महापालिका, एमएमआरडीए आणि एमपीएससीद्वारे घेण्यात आलेल्या विविध भरती परीक्षांमधील पेपरफुटी आणि निकाल घोटाळ्याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात महत्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांना माहिती देणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांची युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी भेट घेत विचारपूस केली.
पेपरफुटी आणि निकाल घोटाळ्याप्रकरणी राज्यभरातील परीक्षार्थी उमेदवारांनी संताप व्यक्त करत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे पुराव्यांसह तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेत आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने परीक्षार्थींच्या शिष्टमंडळाला पुरावे सादर करण्याची संधी देत चौकशी सुरू केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत भायखळा विधानसभेचे शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी परीक्षार्थींना विशेष सहकार्य केले. या कालावधीत युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर आणि युवासेना कॉलेज कक्ष पदाधिकारी दुर्गेश वैद्य यांनी भायखळा येथे जाऊन परीक्षार्थींची विचारपूस केली. आदित्य ठाकरे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दल सर्व परीक्षार्थ्यांनी त्यांचे आभार मानले.


























































