Asian Games 2026 – भुवईवर नऊ टाके… तरीही तलवार थांबली नाही! झांगची पदकासाठी अखेरपर्यंत झुंज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रक्त वाहत होते… भुवईवर वेदना ठसठसत होत्या… पण तैवानचा वुशूपटू झांग हुआन-यी मात्र हार मानायला तयार नव्हता. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या रिंगमध्ये त्याची झुंज प्रतिस्पर्ध्याशी कमी आणि स्वतःच्या वेदनेशी अधिक होती.

सामन्यादरम्यान झांगच्या भुवईवर सुमारे सहा सेंटीमीटरची खोल जखम झाली. त्यावर तब्बल नऊ टाके घालावे लागले. सामान्य माणसासाठी एवढी जखम म्हणजे मैदानापासून दूर जाण्याचे कारण ठरते. मात्र झांगसाठी ती पुन्हा रिंगमध्ये उतरण्याची कसोटी ठरली.

उपचार घेतल्यानंतर झांग पुन्हा मैदानात उतरला. चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या, पण नजरेत विजयाची चमक होती. उपांत्य फेरीत त्याची तीच जखम पुन्हा उघडली. रक्तस्राव वाढल्याने पंचांना अखेर सामना थांबवावा लागला आणि झांगच्या पदकाच्या सुवर्णस्वप्नाला ब्रेक लागला.

विजय हातातून निसटला, मात्र झांगने दाखवलेली जिद्द मात्र प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली. पदक मिळाले नाही, पण ‘शेवटपर्यंत लढायचे’ या क्रीडाभावनेचे झांगने दिलेले उदाहरण नक्कीच सुवर्णमूल्याचे ठरले.