एमडीआरच्या विरोधात व्यापाऱ्यांचा 2 ऑक्टोबरला ‘नो यूपीआय डे’; कोणतेही डिजिटल पेमेंट नाही, फक्त कॅश स्वीकारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने येत्या 15 ऑक्टोबरपासून यूपीआय पेमेंटवर एमडीआर लागू करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याला राज्यातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला असून यूपीआय व्यवहारांवर लागू होणाऱ्या शुल्काच्या निषेधार्थ 2 ऑक्टोबर रोजी ‘नो यूपीआय डे’ म्हणून हा दिवस पाळला जाणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरने (एमएसीसीआयए) केली आहे. 2 ऑक्टोबरला कोणत्याही व्यापाऱ्यांनी डिजिटल पेमेंट स्वीकारू नये, केवळ रोख रकमेच्या माध्यमातून व्यवहार करावेत, असे आवाहन एमएसीसीआयएने केले आहे.

देशात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असताना त्यावर एमडीआर लादणे हे लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरेल. आमचा विरोध यूपीआय व्यवस्थेला नाही, तर एमडीआर शुल्काला आहे. प्रत्येक व्यवहारावर शुल्क आकारले गेल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या व्यवसायावर होऊ शकतो, असे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष अध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी सांगितले.