
सांगली शहरातील मार्केट यार्डातील एका कंपनीने निर्यात केलेली 54 मेट्रिक टन हळकुंडे परस्पर ताब्यात घेऊन कंपनीची तब्बल 91 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वसीम शब्बीर फकीर (रा. बालाजीनगर, लक्ष्मी मंदिरानजीक, कुपवाड) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना 9 फेब्रुवारी ते 27 जुलै 2026 या कालावधीत घडल्याचे पोलिसांत सांगण्यात आले. पोलिसांनी झम झम अल बहार फिश ट्रेडिंग कंपनी, ट्रिमॅक्स शिपिंग कंपनी, वेस्टविंड शिपिंग कंपनी ऍण्ड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
फिर्यादी वसीम फकीर यांची वसंत मार्केटयार्ड येथे ई-3, ट्रेडर्स कॉम्प्लेक्स नावाचे कार्यालय आहे. 9 फेब्रुवारी ते 27 जुलै या कालावधीत फकीर यांच्या कंपनीने 91 लाख 13 लाख 472 रुपयांच्या 54 मेट्रिक टन हळकुंडाची निर्यात केली होती. मात्र, संशयित तीन कंपन्यांमधील संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे ज्या ठिकाणी माल जाणार होता, त्यापूर्वीच सदर माल परस्पर सोडवून घेतला. ही बाब लक्षात आल्यावर तीन कंपन्यांतील संबंधितांविरोधात फकीर यांनी फिर्याद नोंदवली.






























































