
शहापूर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीतून ४७ हजार मतदार ‘आऊट’ झाले आहेत. या मतदारसंघाच्या यादीत पूर्वी २ लाख ९८ हजार ७३६ मतदार होते. मात्र निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) मोहिमेंतर्गत शहापूर विधानसभा क्षेत्रातील ४७ हजार नावे कमी झाली आहेत. कमी झालेल्या नावांमध्ये दुबार, स्थलांतरित आणि मयत मतदारांचा समावेश आहे.
प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये मतदारांनी आपले नाव तपासून घ्यावीत, या यादीत काही तांत्रिक अडचणीमुळे नाव नसल्यास, नावाची दुरुस्ती करावयाची असल्यास, मतदार संघ बदल करावयाचा असल्यास व नवीन मतदार नोंदणी करावयाची असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत कागदपत्रांसह नोंदणी करता येणार आहे. एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाणार नाही व कोणतीही अपात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होणार नाही हे मुख्य धोरण निवडणूक आयोगाचे आहे. मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.
हरकती आणि सूचना संपल्यानंतर अंतिम यादी येत्या ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. मतदार यादी स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी ही कार्यवाही सुरू आहे. मतदारांनी आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
ज्या मतदारांचे नाव यादीतून वगळले गेले आहे किंवा ज्यांचे नाव अद्याप नोंदवले गेले नाही, अशा पात्र नागरिकांनी तत्काळ मतदार नोंदणीसाठी अर्ज करावा. विशेषतः १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांनी फॉर्म नंबर ६ भरून नाव नोंदणी करावी. नागरिकांना आपले नाव ‘इलेक्ट्रोलसर्च’ या संकेतस्थळावर तपासता येणार आहे.
जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जाऊनही नाव तपासता येणार आहे. फॉर्म नंबर ६ हा ऑनलाइन भरता येणार आहे. तसेच बीएओकडे देता येणार आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नसलेल्या व्यक्तींना योग्य ती कागदपत्रे देऊन आपले नाव नोंदविता येणार आहे, असेही परमेश्वर कासुळे यांनी स्पष्ट केले आहे.































































