
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी मीरा-भाईंदरमध्ये मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅबचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरमध्ये ही सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. या रुग्णालयात अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि लहान मुलांच्या हृदयातील छिद्रांवर शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.
भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी हे मीरा-भाईंदरमधील प्रमुख शासकीय रुग्णालय असून त्याची क्षमता २०० खाटांची आहे. रुग्णालयावर सध्या मोठा रुग्णभार आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या सुविधा आणि उपचार क्षमता वाढविण्याच्या मोहिमेअंतर्गत मार्च २०२४ मध्ये कार्डियाक कॅथलॅबला मंजुरी देण्यात आली होती. या इमारतीचे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल काम पूर्ण झाले असून आवश्यक वैद्याकीय उपकरणेही बसविण्यात आली आहेत. या ठिकाणी १० खाटांचा सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयू) तयार करण्यात आला आहे.
- कार्डियाक विभागासाठी चार परिचारिकांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
- डॉक्टर, तंत्रज्ञ आणि इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
- कर्मचाऱ्यांची नियुक्ती पूर्ण होताच ही सेवा रुग्णांसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणार
हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होताच कार्डियाक कॅथलॅब रुग्णसेवेसाठी खुली केली जाईल. या केंद्रात रक्तवाहिन्यांमधील अडथळे तपासण्यासाठी अँजिओग्राफी, ब्लॉकेजवर उपचार करण्यासाठी अँजिओप्लास्टी तसेच बालहृदयरुग्णांच्या हृदयातील छिद्रांवर आवश्यक शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सुविधेमुळे मीरा-भाईंदर परिसरातील हृदयरुग्णांची उपचारासाठी मुंबई किंवा गुजरातमधील मोठ्या रुग्णालयांकडे धाव वाचणार आहे.































































