
लालबाग गणेश गल्लीतील ‘मुंबईचा राजा’ अर्थात लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा 99 वे वर्ष आहे. यंदा पहिल्यांदाच 22 फुटी भव्य ‘मुंबईच्या राजा’चे विसर्जन गिरगाव चौपाटी येथे अत्याधुनिक ‘बार्ज’वरून थेट खोल समुद्रात करण्यात येणार आहे. मुंबईच्या गणेशोत्सवात असा प्रयोग पहिल्यांदाच होत असून, हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे.
शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता महाआरती करून ‘मुंबईचा राजा’चा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक लालबाग ते गिरगाव चौपाटी या पारंपरिक मार्गाने मार्गक्रमण करेल. यंदा पहिल्यांदाच ‘मुंबईचा राजा’चे खोल समुद्रात विसर्जन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मान्यतेनुसार या ऐतिहासिक विसर्जनासाठी शुक्रवारी रात्री 8 ते 11 ही वेळ निश्चित केल्याची माहिती सरचिटणीस स्वप्नील परब यांनी दिली.






























































