
कानात इअरफोन घालून रेल्वेरुळावरून चालणे एका तरुणीच्या जीवावर बेतल्याची घटना हातकणंगले येथे घडली. मागून येणाऱ्या धनबाद एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनुष्का संतोष पोवार (वय 17, रा. वेताळ पेठ, इचलकरंजी) हिचा मृत्यू झाला.
बुधवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वेरुळावर ही दुर्घटना घडली. अनुष्का आपल्या दोन मैत्रिणींसह रुळावरून चालत जात होती. कानात इअरफोन असल्याने तिला मागून येणाऱ्या धनबाद एक्स्प्रेसच्या हॉर्नचा अंदाज आला नाही. सोबत असलेल्या मैत्रिणींनी तिला वाचवण्यासाठी आरडाओरडा करत धाव घेतली. मात्र, त्या तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच भरधाव रेल्वेने अनुष्काला धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनुष्काला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. डोळ्यांदेखत घडलेल्या या अपघातामुळे तिच्या मैत्रिणींना मानसिक धक्का बसला आहे. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे. इअरफोन वापरण्याच्या निष्काळजीपणामुळे तरुणीच्या झालेल्या मृत्यूबाबत परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.



























































