सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून 529 कोटींचा खर्च, सर्वाधिक खर्च पश्चिम बंगालमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने एकूण 529.38 कोटी रुपये खर्च केले आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या पक्षाच्या निवडणूक खर्चाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या एकूण खर्चापैकी निम्म्याहून अधिक रक्कम एकट्या पश्चिम बंगालमध्ये खर्च करण्यात आली आहे. भाजपने पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपने सुमारे 286 कोटी रुपये खर्च केले.

भाजपने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या खर्चाच्या अहवालात आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांतील खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. या पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांसाठी पक्षाच्या केंद्रीय यंत्रणेने एकूण 529.38 कोटी रुपये खर्च केल्याचे अहवालातून समोर आले आहे.

बंगालमध्ये प्रचारावर 217 कोटींचा खर्च

पश्चिम बंगालमध्ये भाजपने एकूण सुमारे 286 कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी 217.16 कोटी रुपये पक्षाच्या सर्वसाधारण निवडणूक प्रचारावर खर्च करण्यात आले. उमेदवारांशी संबंधित खर्चासाठी 69.83 कोटी रुपये खर्च झाले. यामध्ये 58.80 कोटी रुपये उमेदवारांना देण्यात आले आहेत.

भाजपने केलेला राज्यनिहाय खर्च 

आसाम – 96.26 कोटी रुपये
केरळ – 82.67 कोटी रुपये
तामिळनाडू – 51.56 कोटी रुपये
पश्चिम बंगाल – 286 कोटी रुपये
पुडुचेरी – 11.89 कोटी रुपये

निवडणूक कालावधीत भाजपला 1,494 कोटी रुपयांच्या प्राप्ती झाल्याचे अहवालात नमूद आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षाकडे बँक खात्यातील शिल्लक आणि रोख रक्कम मिळून 7,689.06 कोटी रुपयांचा क्लोजिंग बॅलन्स होता.