रक्षकच झाले भक्षक! उत्तरप्रदेशमध्ये पोलीस व CRPF जवानांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एका फार्महाऊसवर हरयाणातील २४ वर्षीय तरुणीवर कथित सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांचे दोन कर्मचारी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) दोन जवानांना अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या कारवाईची माहिती दिली.

ही धक्कादायक घटना अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये हसनपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एक उपनिरीक्षक (Sub-Inspector) व एक हेड कॉन्स्टेबल, तसेच सीआरपीएफचे (CRPF) एक उपनिरीक्षक आणि एका हेड कॉन्स्टेबलचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक (SP) लखन सिंह यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही हरयाणातील फतेहाबाद येथील रहिवासी आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २० सप्टेंबर रोजी तिच्या एका परिचयाच्या महिलेने तिच्याशी संपर्क साधला होता. तिने अमरोहा येथील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सौरंग गावचा रहिवासी असलेल्या सीआरपीएफ इन्स्पेक्टर मोहित याला भेटण्यास सांगितले होते. यानंतर त्या पोलिसाने तिला फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर हा अत्याचार केला, त्याच्यासोबत असलेल्या अन्य तिघांनीही आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.