निवडणूक आयोगाची ‘मॅच फिक्सिंग’ उघड; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा – राज ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हुकूमशाही आणि घोटाळेबाज कारभाराविरोधात निवडणूक आयोगात बंड झाले आहे. निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआर प्रक्रियेला आणि त्यातील अनेक गोष्टींना विरोध दर्शवला होता. ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर देशभरात संतापाचा स्फोट झाला असून विरोधकही आक्रमक झाले आहेत. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाची ‘मॅच फिक्सिंग’ उघड झाली असून ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी एक्सवर पोस्ट करून केली.

केंद्रीय निवडणूक आयोगात सध्या सुरू असलेला कारभार म्हणजे उघडउघड ‘मॅच फिक्सिंग’ असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. गेल्या १10 महिन्यांत केंद्रीय निवडणूक आयोगचे दोन आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी आयोगाच्या मनमानी निर्णयांवर तब्बल 14 वेळा ऑन रेकॉर्ड आक्षेप नोंदवले आहेत. आम्ही आणि इतर विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि मतदार याद्यांमधील फेरफारांवर जे आरोप करत होतो, त्याची सत्यता आज पुराव्यासह सिद्ध झाली आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

देशभरातून संताप; इलेक्शन कमिशन चोर आहे! ज्ञानेश कुमार गेट आऊट!! निवडणूक आयोगातील बंडाळी चव्हाट्यावर

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत की इतर राज्यातील विधानसभा निवडणुका, निवडणूक आयोग पूर्णपणे केंद्र सरकारच्या तालावर नाचत असल्याचा आरोप यावेळी राज ठाकरे यांनी केला. निवडणूक आयोग स्वायत्त असणे आता केवळ पुस्तकापुरतेच उरले आहे. स्वायत्ततेची व्याख्या भाजपच्या अधीन असणे हीच झाली आहे का? असा सवालही त्यांनी केला.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पाठीमागे कोणता बोलविता धनी आहे याचीही निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली. तसेच सर्व विरोधी पक्षांना आता एकत्र येऊन स्वायत्ततेच्या रक्षणासाठी आणि ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केले.