
रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी लावलेल्या फलकावर नाव न छापल्याने आज भाजप व शिंदे गटात चांगलीच जुंपली. माता रमाई चौक ते नवली वेवूर या मुख्य रस्त्यापर्यंतच्या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. मात्र सत्ताधारी शिंदे गटाने भूमिपूजन समारंभाच्या फलकावर जाणीवपूर्वक स्थानिक नगरसेवकांची नावे टाकली नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावरून भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट कार्यक्रम स्थळावर धडक देत नगराध्यक्ष उत्तम घरत यांना फैलावर घेतले. त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले.
माता रमाई चौक ते नवली नाकादरम्यानचा हा रस्ता सुमारे ४०० ते ५०० मीटर लांबीचा आहे. या रस्त्यापैकी एका टप्प्याचे काम मे महिन्यात पूर्ण झाले असून उर्वरित काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिंदे गटाचे नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्यासह त्यांचे नगरसेवक उपस्थित होते. मात्र भूमिपूजनासाठी लावण्यात आलेल्या अधिकृत फलकावर प्रभाग क्रमांक ३ व ४ मधील भाजपच्या इतर नगरसेवकांची नावे छापण्यात आली नव्हती.
याची माहिती मिळताच भाजपचे माजी नगरसेवक प्रवीण मोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या फलकावर आक्षेप घेतला. सत्ताधारी शिंदे गटाने जाणीवपूर्वक विरोधकांना डावलण्यासाठी फलकावर नावे छापली नाहीत, असा आरोप केला. त्यावर नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी रस्त्याच्या निधीसाठी ज्या नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी रस्त्याच्या निधीसाठी ज्या नगरसेवकांनी प्रयत्न केले आणि ज्यांचा हा प्रभाग आहे त्यांची नावे या फलकावर छापल्याचे सांगितले. त्यावर भाजपचे माजी नगरसेवक प्रवीण मोरे यांनी आक्षेप घेत फलक छापताना प्रशासकीय मंजुरी घेतली का, असा सवाल केला. त्यामुळे काही काळ दोन्ही गट आमनेसामने आले.































































