
आगामी नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला असून, तुरुंगात असलेले काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांच्या पत्नी अर्पिता प्रधान यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत निवडणुकीच्या तोंडावर पतीला १९ वर्षे जुन्या आणि खोट्या गुन्ह्यांत जाणीवपूर्वक अडकवल्याचा दावा अर्पिता यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेसचे राज्य मुख्यालय असलेल्या विधान भवन येथे पत्रकारांशी बोलताना अर्पिता प्रधान म्हणाल्या, “निवडणुकीच्या अगदी आधी माझ्या पतीला अशा जुन्या प्रकरणात का तुरुंगात पाठवण्यात आले? ज्या गुन्ह्यात मिलन यांना अटक झाली आहे. त्याच प्रकरणात स्वतः शुभेंदू अधिकारी हेदेखील आरोपी होते, मग ते बाहेर कसे? आपण विरोधी पक्षात आहोत म्हणूनच आपल्यावर हा अन्याय होत आहे.” सध्या देशात इंग्रजांचे राज्य असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून खऱ्या गुन्हेगाराला मुख्यमंत्रिपदाचे अभय असल्याने तो मोकाट फिरत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, २००७ च्या नंदीग्राम जमीन अधिग्रहण विरोधी आंदोलनाशी संबंधित हत्या आणि इतर काही प्रकरणांमध्ये मिलन प्रधान यांना नुकतीच अटक करण्यात आली असून, त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.




























































