
राज्यसेवा आयोगाला पेपरफुटीचे ग्रहण लागल्याचा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भिमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आयोगातील भ्रष्टाचाराची स्वच्छता शक्य नसल्याचे स्पष्ट करत, विविध मागण्यांसाठी येत्या 27 सप्टेंबरपासून होणाऱ्या विद्यार्थी आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे रोहित पवार यांनी जाहीर केले आहे. तसेच, प्रशासनाकडून कितीही नोटीसा दिल्या, परवानगी नाकारली किंवा दबावतंत्र वापरले तरी हे आंदोलन ठरल्याप्रमाणे होणारच, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
या संदर्भात रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, सध्या राज्यसेवा आयोगाच्या विश्वासार्हतेला मोठा तडा गेला असून, पारदर्शक कारभारासाठी भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा घेणे अत्यंत आवश्यक आहे. अध्यक्षांचा राजीनामा देऊन त्या पदावर स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची नियुक्ती करावी, सरकारने केलेल्या घोषणेनुसार 70 हजार पदांची भरती तातडीने सुरू करावी आणि विद्यार्थ्यांकडून वर्षभर परीक्षांसाठी केवळ शंभर रुपये शुल्क आकारले जावे, यांसारख्या विविध न्याय्य मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी 27 सप्टेंबरपासून आंदोलनाची हाक दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी त्यांची निवड करणारी यंत्रणा देखील पारदर्शक असणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आजच्या घडीला राज्यसेवा आयोगाला पेपरफुटीचं ग्रहण लागलं असून आयोगाच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. आयोगाचे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आयोगातील भ्रष्टाचाराचे क्लीनअप शक्यच नाही. भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा घेऊन विद्यार्थ्यांना विश्वासात… pic.twitter.com/Nf7Bf3PDfk
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 24, 2026
पुढे बोलताना रोहित पवार यांनी पुणे पोलिसांनी विद्यार्थी, क्लासचालक आणि टेलिग्राम चॅनेल चालकांना धमक्या देणे किंवा नोटीसा पाठवणे तातडीने थांबवावे, असे म्हटले आहे. जर नोटीसा द्यायच्याच असतील, तर त्या मला देण्यात याव्यात, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या अत्यंत रास्त असून त्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्यामुळे या युवाशक्तीच्या लढ्याला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील विद्यार्थ्यांच्या या लढ्या पाठीशी उभे राहून ताकद देतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.



























































