जमशेदपुरमध्ये भीषण अपघात; झारखंडच्या मंत्री दीपिका पांडे यांच्या मुलीसह चार जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमशेदपूरच्या राष्ट्रीय महामार्गावर (NH) गुरूवारी 24 सप्टेंबर रोजी एक अत्यंत भीषण रस्ता अपघात झाला. या दुर्घटनेत झारखंडच्या ग्रामीण विकास मंत्री दीपिका पांडे सिंग यांची मुलगी तृषा सिंह हिचे दुर्दैवी निधन झाले आहे. या भीषण अपघातात तृषा हिच्यासह तिच्या तीन मित्रांचाही जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोनारी पोलीस स्टेशन परिसराजवळ घडला. महामार्गावर एक ब्रेकडाऊन झालेला ट्रेलर (मोठा ट्रक) उभा होता. यादरम्यान पाठीमागून भरधाव वेगात येणारी कार थेट त्या ट्रेलरला जाऊन जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गॅस कटरच्या साहाय्याने कार कापून मृतदेह बाहेर काढले गेले. या अपघातात मृतदेहांचा चेंदामेंदा झाला होता.

मृतक तृषा ही एलएलआरआई (LLRI) ची विद्यार्थिनी होती आणि ती आपल्या मित्रांसोबत कारने प्रवास करत असताना हा घात झाला. एकाच वेळी चार तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे या घटनेने जमशेदपूरसह संपूर्ण झारखंड राज्यात शोककळा पसरली आहे.

या अपघातानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आरोग्यमंत्री इरफान अंसारी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त करताना म्हटले की, “या अत्यंत कठीण प्रसंगात आम्ही दीपिकाजी आणि शोकाकुल कुटुंबासोबत आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती देवो.” तसेच मंत्री इरफान अंसारी यांनीही या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त करून कुटुंबाला धीर मिळावा अशी प्रार्थना केली आहे.