गावातील नळपाणी पुरवठा योजना आता महिला बचत गटांच्या हाती; देखभाल आणि दुरुस्तीचीही जबाबदारी सांभाळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणी हा केवळ मानवी जगण्याचा मूलभूत घटक नसून ग्रामीण महिलांच्या संवेदनशील भावनांचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. हीच नाळ ओळखून केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेने देशात पथदर्शी ठरेल, असा एक क्रांतीकारी आणि अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. गावातील नळपाणी पुरवठा योजनांचे संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची संपूर्ण धुरा आता सक्षमपणे महिला बचत गटांच्या हाती सोपवण्यात आली असून, या प्रयोगाने ग्रामीण विकासाला आणि महिलांच्या आत्मविश्वासाला एक नवी उभारी दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली.

लांजा तालुक्यातील ‘निवोशी-इंदवटी’ या गावातून या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. तेथे योजनेची धुरा महिला बचत गटाच्या हाती सोपवण्यात आली आणि महिलांनीही हे आव्हान समर्थपणे पेलले. पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता राखणे, पाण्याचे रासायनिक व जैविक परीक्षण (टेस्टिंग) करणे, टीसीएल (TCL) प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे आणि प्रत्येक वाडी-वस्तीला काटेकोर व वेळेवर पाणी वाटप करण्याचे नियोजन महिलांनी चोख बजावले आहे. एवढेच नव्हे, तर पाणी पुरवठ्यातील अडचणी, नळ दुरुस्तीच्या तक्रारी सोडवण्यातही महिला वर्ग अग्रेसर ठरला आहे.

प्लंबिंगचे धडे गिरवून महिला होणार आत्मनिर्भर

सध्या दुरुस्तीच्या कामांसाठी महिलांना प्लंबरवर अवलंबून राहावे लागत असले, तरी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत याच बचत गटातील महिलांना आता प्लंबिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यापासून ते संपूर्ण व्यवस्थापनापर्यंत योजनेची संपूर्ण सूत्रे शंभर टक्के महिलांच्याच हाती राहतील.

शतप्रतिशत पाणीपट्टी वसुली आणि ग्रामपंचायतीचे प्रोत्साहन

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जलजीवन योजनेचा १० टक्के लोकसहभाग आणि पाणीपट्टी गोळा करणे हे मोठे आव्हानात्मक काम ठरत असताना, निवोशीच्या महिलांनी मात्र, १०० टक्के पाणीपट्टी वसुली करून दाखवत एक नवा आदर्श निर्माण केला. इतकेच नाही, तर योजनेच्या शाश्वततेसाठी पाणीपट्टीत मासिक २० रुपयांची वाढ करण्याची महत्त्वपूर्ण सूचना महिलांनी मांडली आणि ग्रामपंचायतीने ती सहर्ष मान्यही केली. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ग्रामपंचायतीने प्रोत्साहन म्हणून महिलांना २ टक्के इन्सेंटिव्ह (मानधन) देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला आहे.

निवोशीतील यशानंतर या प्रयोगाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील ‘वळके’ आणि गुहागर तालुक्यातील ‘खामशेत’ या गावांमध्येही ही योजना महिला बचत गटांच्या हाती यशस्वीपणे सुरू आहे. तर राजापूर तालुक्यातील ‘खरवते’ येथे चौथी योजना महिलांकडे सोपवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय जलजीवन मिशन (NJJM) समोरही या यशस्वी मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले असून त्यास मोठी दाद मिळाली आहे.

पाणी हा महिलांच्या थेट अस्तित्वाचा आणि जिव्हाळ्याचा भाग असल्याने पाण्याचे मूल्य आणि नियोजन त्यांच्याइतके प्रभावीपणे कोणीच करू शकत नाही. म्हणूनच या वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक नळपाणी योजना महिला बचत गटांमार्फत चालवण्याचा आमचा संकल्प आहे. हा केवळ पाणीपुरवठ्याचा प्रकल्प नसून महिलांच्या क्षमतांवर विश्वास ठेवून त्यांना स्वावलंबी बनवणारा एक दीपस्तंभ आहे.” – वैदेही रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. रत्नागिरी