मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर चालणार महाभियोग? विरोधक प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ANI ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, विरोधी पक्ष संसदेत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी गुरुवारी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात नवी दिल्लीत थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. मतदार यादीत फेरफार केल्याचा आणि निवडणूक आयोगात इतर आयुक्तांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप मोईत्रा यांनी केला आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्य निवडणूक आयुक्तांनी इतर निवडणूक आयुक्तांना अंधारात ठेवून मतदार याद्यांसंदर्भातील निर्णय परस्पर घेतल्याचा दावा करण्यात आला होता. याच आधारावर विरोधक आक्रमक झाले असून, महुआ मोईत्रा यांनी कुमार यांच्यावर गुन्हेगारी कृत्य केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या सर्व घडामोडींनंतर, विरोधी पक्षांनी आता ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी कायदेशीर आणि संसदीय मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. संसदेत महाभियोगाचा प्रस्ताव आणून सरकारवर दबाव वाढवण्याची विरोधकांची रणनीती असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगासारख्या अत्यंत महत्त्वाच्या घटनात्मक संस्थेच्या प्रमुखांवरच अशा प्रकारचे आरोप झाल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.