Nagar News – गणपती विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा मृत्यू; व्हिडीओ व्हायरल, पोलीस अधीक्षक म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहिल्यानगरमधील भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या आरोपावरून आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते दीपक वागसकर यांच्या मृत्यूनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुलाल उधळण्यावरून झालेल्या वादानंतर पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केल्याचा आणि ध्वज हिसकावून घेतल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या कारवाईत महिला व वयोवृद्धांनाही मारहाण झाल्याचे दावे केले जात आहेत.

या घटनेनंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका लाठीचार्जमुळे झाला की अन्य कारणाने, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणावर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्पष्टीकरण दिले असून, व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि प्रत्यक्ष घटनेची वेळ व ठिकाण यात तफावत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, बॉडीकॅमच्या नोंदी आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे घटनेची वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी होत असून, प्रशासनाच्या पुढील भूमिका व अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.