महुआ मोईत्रा यांची मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात पोलिसांत तक्रार, मतदार यादीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात त्यांनी ही तक्रार नोंदवली. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आल्याचा आणि निवडणूक आयोगात इतर आयुक्तांना अंधारात ठेवून एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याचा दावा करत मोईत्रा यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेत पारदर्शकता नसून याद्वारे मतांची चोरी होत असल्याचा आरोप मोईत्रा यांनी केला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्य निवडणूक आयुक्तांनी इतर आयुक्तांना विश्वासात न घेता मतदार याद्यांसंदर्भातील निर्णय एकतर्फी घेतल्याचे समोर आले होते. याच अहवालांचा आधार घेत मोईत्रा यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गुन्हेगारी कृत्य केल्याचा ठपका ठेवला असून, त्यांनी तातडीने राजीनामा देऊन माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

तसेच नवीन कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांना मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाला आव्हान देत, अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृतींसाठी त्यांना कोणतीही सूट मिळता कामा नये, असे मोईत्रा यांनी म्हटले आहे.